बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात दिनांक अलीकडेच बेळगाव शहरातील शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये वाहतूक सुरक्षितता आणि सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने, शाळा/महाविद्यालयांजवळील पार्किंगची समस्या सोडवण्यावर चर्चा झाली.
शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांना पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. जर संस्थेच्या आवारात जागा उपलब्ध नसेल, तर वेगळी जागा शोधून तिथे पार्किंगची व्यवस्था करावी, जेणेकरून वाहतूक पोलिसांना सहकार्य मिळेल, अशी विनंती करण्यात आली.
या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत, जिजामाता सर्कलजवळील भरतेश एज्युकेशन ट्रस्टने जवळच्या खाजगी पार्किंग कंत्राटदाराशी संपर्क साधून आपल्या कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था केली. या पार्श्वभूमीवर, बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त यांनी भरतेश एज्युकेशन संस्थेला भेट देऊन संस्थेचे उपाध्यक्ष श्री. श्रीपाल खेमलापुरे, सचिव विनोद दोड्डन्नावर आणि संस्थेच्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले.
बेळगाव शहरातील रस्ते सुरक्षा आणि सार्वजनिक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्व शिक्षण संस्थांनी याच प्रकारे आपल्या कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी आवश्यक उपाययोजना करून बेळगाव शहर पोलीस विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


