बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या चार प्रमुख स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. या समित्यांमध्ये प्रत्येकी सात सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टण्णवर यांनी या नवीन स्थायी समिती अध्यक्षांची घोषणा केली. या निवडीचा मुख्य उद्देश आगामी एक वर्षाच्या कालावधीत महापालिकेच्या विकासकामांमध्ये आणि जनसेवेत गुणवत्ता राखणे हा आहे असे प्रादेशिक आयुक्तांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक न्याय स्थायी समिती, कर, अर्थसंकल्प व अपील स्थायी समिती, शहर योजना व विकास स्थायी समिती आणि लेखा स्थायी समिती या चारही समित्यांमध्ये सदस्यांची निवड झाली आहे.
सार्वजनिक आरोग्य समितीमध्ये सत्ताधारी पक्षाकडून लक्ष्मी राठोड, अभिजित जवलकर, रूपा चिक्कलदिण्णी, नितीन जाधव आणि प्रीती कामकर यांची निवड झाली आहे, तर विरोधी पक्षातून मोदीनसाब मतवाले आणि वैशाली भातकांडे यांना संधी मिळाली आहे.
त्याचप्रमाणे, कर, अर्थसंकल्प व अपील स्थायी समितीमध्ये सत्ताधारी पक्षाकडून संतोष पेडणेकर, रमेश मैल्यागोळ, जयंत जाधव, सारिका पाटील आणि रेखा हूगार यांची निवड झाली आहे. विरोधी पक्षाकडून अजीम पटवेगार आणि अफरोज मुल्ला यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. या सर्व सदस्यांना पुढील एक वर्षासाठी महानगरपालिकेच्या कारभारात सहभागी होऊन शहराच्या विकासाला हातभार लावण्याची संधी मिळाली आहे.


