बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या अलीकडच्या सर्वसाधारण सभा विविध मुद्द्यांवरून गाजत आहेत. नवनियुक्त नगरसेवक असूनही ते अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडत असल्याने महापालिकेचे राजकारण चर्चेत आहे.
राज्यात काँग्रेसची सत्ता आणि बेळगाव महापालिकेत भाजपची सत्ता यामुळे निधीवाटप आणि इतर अनेक मुद्द्यांवरून प्रत्येक सभा वादग्रस्त ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर रस्त्यावरील विक्रेत्यांकडून जास्त ‘भूभाडे’ वसूल केल्याच्या मुद्द्यावरूनही जोरदार वाद निर्माण झाला आहे.
या प्रकरणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत जास्त भाडे आकारणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. महापालिकेच्या दुकानांपेक्षाही जास्त भाडे आकारले जात असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. यामुळे, ‘गरीब विक्रेत्यांकडून जबरदस्तीने पैसे वसूल केले जात आहेत. दररोज १०० रुपये भाडे घेणे थांबवावे आणि दोषींवर एफआयआर दाखल करण्याची परवानगी द्यावी’, अशी मागणी विरोधी सदस्य अझीम पटवेगार यांनी केली.
या बैठकीच्या सुरुवातीलाच ‘भूभाडे’ आणि नवीन स्वच्छता कर्मचारी पॅकेजच्या मुद्द्यांवरून चर्चा सुरू झाली. विरोधी सदस्यांनी या विषयांना पुढील बैठकीत ठेवण्याची मागणी केली. मात्र, सत्ताधारी पक्षाने तातडीने चर्चा करण्याचा आग्रह धरला. यामुळे संतापलेल्या विरोधी सदस्यांनी, ‘यामध्ये काहीतरी लपवले जात आहे आणि घाईघाईने याला मंजुरी दिली जात आहे’, असा आरोप केला.
यादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये नेत्यांच्या उपस्थितीवरूनही वाद झाला. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक रवी धोत्रे यांनी प्रश्न उपस्थित केले. गणेशोत्सव तयारी, शहरातील नियोजन यासह अनेक प्रश्न उपस्थित केले. यामुळे संतप्त झालेल्या विरोधी सदस्यांनी ‘आमच्या नेत्याबद्दल प्रश्न विचारण्याचा सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना काय अधिकार आहे? आमच्या नेत्याने सुट्टीवर असल्याची माहिती महापौरांना आधीच दिली आहे.’ असे मत मांडले. यावर, आयुक्त शुभा बी. यांनी सांगितले की, ‘चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. तुमच्या काही सूचना असल्यास त्या इथे द्या, पुढील बैठकीपर्यंत त्यावर कारवाई केली जाईल.’
या चर्चेत, विरोधी सदस्य मुजम्मिल ढोणी यांनी व्हेंडर झोनमधील भाड्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर आयुक्तांनी सांगितले की, ‘बेळगावात ४ ठिकाणी व्हेंडर झोन तयार करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत, त्यापैकी २ जागा निश्चित झाल्या आहेत. तिथे मूलभूत सुविधा पुरवल्यानंतरच भाड्यामध्ये सूट दिली जाईल.’
विधान परिषद सदस्य साबण्णा तळवार यांनी ‘महानगरपालिकेने भूभाड्याबद्दल प्रमुख रस्त्यांवर फलक लावावे, किंवा नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती द्यावी’, अशी सूचना केली.
या बैठकीला उपमहापौर वाणी जोशी, उपायुक्त उदयकुमार तळवार, रेश्मा ताळिकोटी, नगरसेवक, नामनिर्देशित सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


