बेळगाव लाईव्ह: श्री गणेशोत्सव कोणताही त्रास न होता सुरळीत पार पडावा यासाठी या उत्सवापूर्वी शहरातील खराब झालेल्या रस्त्यांची खड्डे बुजवून दुरुस्ती, तसेच झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि स्वच्छतेची कामे पूर्ण केली जातील. त्याबरोबरच श्री गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी मिरवणूक मार्ग उत्तम प्रकारे दुरुस्त करून सुसज्ज केला जाईल, अशी माहिती बेळगाव महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी दिली.
बेळगाव महापालिका कार्यालयामध्ये आज शुक्रवारी सकाळी त्या प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. आयुक्त शुभा बी. यांनी सांगितले की, येत्या गणेशोत्सवापूर्वी शहरातील खराब झालेल्या रस्त्यांची खड्डे बुजवून दुरुस्ती, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि स्वच्छतेची कामे पूर्ण केली जातील. त्याचप्रमाणे आज सकाळी पोलीस प्रशासनासोबत आम्ही श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी देखील केली रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्याच्याबद्दल सविस्तर माहिती प्रसिद्धी माध्यमांना लवकरच दिली जाईल.
सध्या पावसामुळे या सर्व कामांमध्ये व्यत्यय येत आहे. तथापि आज जशी उघडीप आहे तशी कायम राहिल्यास वेटमिक्सच्या सहाय्याने खड्डे पडलेल्या रस्त्यांचे पॅचवर्क केले जाईल. याखेरीज विसर्जन मिरवणुकीपर्यंत गणेश उत्सवाच्या 11 दिवसाच्या कालावधीत शहरातील खराब झालेले सर्व रस्ते खड्डे बुजून व्यवस्थित दुरुस्ती मिरवणूक मार्गावरील उघड्या गटारी बंदिस्त केल्या जातील. या पद्धतीने श्री गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व ती व्यवस्था केली जाईल.
गटारीच्या स्वच्छतेबद्दल बोलताना पावसाळ्यापूर्वी गेल्या फेब्रुवारीत आम्ही शहरातील गटारींची स्वच्छता केली होती मात्र आता पावसाच्या पाण्यामुळे पुन्हा गटारींमध्ये गाळ, केरकचरा साचू लागला आहे. त्यांचीही लवकरच प्रभाग वार टप्प्याटप्प्याने स्वच्छता केली जाईल मात्र तत्पूर्वी श्री विसर्जन मिरवणूक मार्गावरील गटारी स्वच्छ केल्या जातील, असे आयुक्तांनी सांगितले. महाप्रसादाबाबत माहिती देताना श्री गणेशोत्सवानिमित्त यंदा महापालिका कार्यालय आवारातच पालिका अधिकारी कर्मचारी नगरसेवक आणि इतर खात्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील वर्षी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून बजेट ठरवून सार्वजनिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
आज सकाळी आम्ही पोलीस आयुक्तांसोबत शहरात पाणी दौरा केला त्यावेळी पोलीस आयुक्तांनी केलेल्या सूचनेनुसार मिरवणूक मार्गावरील उघड्या गटारी तात्पुरत्या बंद केल्या जातील कारण खरंतर स्वच्छता करणे सुलभ जावे यासाठी गटारी ठिकठिकाणी खुल्या ठेवल्या गेल्या पाहिजेत, त्यावर संपूर्ण स्लॅब घालून उपयोग नाही. तथापि गणेश भक्तांची सुरक्षितता लक्षात घेऊन मिरवणूक मार्गावरील उघड्या असलेल्या गटारी बंद करण्यात येतील. त्याचप्रमाणे मिरवणूक मार्गावरील रस्त्याशेजारी थाटण्यात आलेली पानपट्टी, चहा वगैरेंचे स्टॉल देखील हटवण्यात येतील. रस्त्यावर किरकोळ साहित्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा अडथळा दूर करण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी लवकरच शहरात ठराविक ठिकाणी नियुक्त जागा उपलब्ध करून दिली जाईल.
याखेरीज त्या ठिकाणी त्यांच्याकरिता पिण्याचे पाणी, शौचालय वगैरे आवश्यक मूलभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील. हे सर्व टप्प्याटप्प्याने केले जाईल असे सांगून या खेरीज स्मार्ट सिटीची ई -टॉयलेट्स आणि आमची सार्वजनिक स्वच्छतागृह यांच्या देखभालीसाठी आम्ही निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखील यापुढे व्यवस्थित देखभाल करून जनतेची सोय केली जाईल, असे मनपा आयुक्त शुभा बी. यांनी शेवटी सांगितले.


