बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या समस्या व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (एआयटीयूसी) खानापूर शाखेच्यावतीने आज दिल्ली येथे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांच्या नेतृत्वाखालील एआयटीयूसीच्या शिष्टमंडळाने मंत्री अन्नपूर्णा देवी यांना नवी दिल्ली येथे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. याप्रसंगी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या पत्नी व अंगणवाडी शिक्षिका सौ. रुक्मिणी हलगेकर, मेघा मिठारी, अनिता पाटील, भारती पै, सुमित नाईक, प्रदीप हलगेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात खानापूर तालुक्यातील अल्पसंख्याक भाषिक (मराठी भाषिक) अंगणवाडी सेविकांना भेडसावणाऱ्या समस्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हंटले आहे की, या सेविका बाल संगोपन, पोषण व प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत असूनही त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या व अडचणी पुढीलप्रमाणे आहेत. रेशन कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे पालकांकडून तक्रारी होत आहेत. टीएचआर प्रक्रियेदरम्यान पालक ओटीपी देत नाहीत, त्यामुळे डेटा अपलोड होऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम रेशन पुरवठ्यावर होतो. अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाइल योग्य प्रकारे कार्यरत नाहीत. एअरटेलचे सिमकार्ड दिले असले तरी संबंधित भागात नेटवर्क कव्हरेज अत्यंत खराब आहे. या खेरीज ज्या अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे त्या इतर भागात स्थलांतरित कराव्यात. गेल्या 20-25 वर्षांपासून सुरू असलेल्या कांही अंगणवाड्यांमध्ये आजही विद्यार्थी संख्या फारच कमी आहे. त्यातील कर्मचारी जास्त संख्या असलेल्या केंद्रांमध्ये स्थलांतरित करावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सेविका व मदतनीस यांना निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी मिळायला हवी. कर्नाटक सरकारने 2024 पासून ही योजना सुरू केली असली तरी 2011-12 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळावा. अंगणवाडी सेविकांना इतर सरकारी कर्मचाऱ्यांइतका भत्ता मिळावा. सरकार मोठ्या प्रमाणात खाजगी शाळांना मान्यता देत आहे, त्यामुळे अंगणवाड्यांमध्ये प्रवेश संख्या घटली आहे. गेल्या 20-25 वर्षांपासून सेविकांनी विविध भाषांमध्ये काम केले आहे. मात्र सध्या फक्त कन्नड भाषेचा आग्रह असल्यामुळे त्यांच्या पदोन्नतीस अडथळा निर्माण झाला आहे. या सर्व मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन अंगणवाडी सेविकांचे कार्य सन्मानपूर्वक आणि सुलभ होईल यासाठी आवश्यक त्या सुधारणा तातडीने कराव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर शिष्टमंडळाच्या दौऱ्यामुळे खानापूर तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांच्या न्याय हक्कासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, अशी आशा व्यक्त होत आहे.


