बेळगाव लाईव्ह : अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या जय किसान भाजी मार्केट वादावर अखेर पडदा पडला आहे. भू-वापर बदलासाठी सादर केलेल्या अर्जात फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर बेळगाव नगरविकास प्राधिकरणाने (बुडा) संबंधित जागेचा आदेश रद्द करत मूळ भू-उपयोग कायम ठेवला आहे.
मृत व्यक्तीच्या नावाने भू-वापर बदलासाठी अर्ज सादर करून फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर बेळगाव नगरविकास प्राधिकरणाने (बुडा) मोठी कारवाई केली आहे. शहरातील जय किसान भाजी मार्केटसाठी २०१४ साली दिलेला भू-वापर बदलाचा आदेश आता रद्द करण्यात आला आहे.
ज्या जागेवर हे खाजगी भाजी मार्केट उभारले जात होते, त्या जागेच्या वापराबाबतचा आदेश रद्द करण्यामागचे कारण धक्कादायक आहे. या जमिनीच्या मूळ मालकांपैकी एक बसलिंगप्पा सिद्धय्यकप्पा भावी यांचे २०११ मध्ये निधन झाले होते, तरीही भू-वापर बदलासाठी २०१३ मध्ये दाखल केलेल्या अर्जात त्यांच्या नावाने अर्ज करण्यात आल्याचे समोर आले.
सरकारच्या मूळ आदेशातील कलमानुसार, ‘जर अर्जात खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्रे असतील, तर भू-वापर बदल आपोआप रद्द होतो’. या फसवणुकीची तक्रार भारतीय कृषी समाज, बेळगावचे अध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी केली होती. या तक्रारीनंतर नगरविकास प्राधिकरणाने (बुडा) चौकशी करून हा आदेश रद्द केला आहे.
या निर्णयाचे सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपाण्णावर यांनी स्वागत केले असून, हा शेतकऱ्यांच्या लढ्याचा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, “हा निर्णय म्हणजे बेळगावातील भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधातील आमचा विजय आहे. आम्ही त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जय किसानला पाठिंबा देणाऱ्या माफिया आणि आमदारांविरुद्ध लढा दिला.”
टोपाण्णावर यांनी जय किसान मार्केटच्या सदस्यांना आता शासकीय एपीएमसीमधील भाजी मार्केटमध्ये दुकानांच्या वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहनही केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव आणि न्याय मिळेल, असे ते म्हणाले. नगरविकास प्राधिकरणाने कारणे दाखवा नोटीस बजावूनही अर्जदारांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने, उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे भू-वापर बदल आपोआप रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.


