बेळगाव लाईव्ह : बेळगावातील ‘जय किसान’ या खासगी भाजी मार्केटची जमिनीच्या वापराची परवानगी नगर विकास प्राधिकरणाने रद्द केली आहे. बनावट आणि चुकीची कागदपत्रे सादर करून ही परवानगी मिळवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. या निर्णयामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी उद्यापासून ‘जय किसान’ मार्केट सोडून सरकारी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये परत यावे, असे आवाहन कृषी संघटनांनी केले आहे. हा शेतकऱ्यांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या लढ्याचा मोठा विजय मानला जात आहे.
आज बेळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणावर सविस्तर माहिती देण्यात आली. नितीन बोलबंदि यांनी सांगितले की, २०११ मध्ये मरण पावलेल्या बसलिंगप्पा भावी यांच्या नावाने २०१३ मध्ये अर्ज दाखल करून ‘जय किसान’ मार्केट सुरू करण्यात आले होते. हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर होते. ते पुढे म्हणाले, “कृषी जमिनीचा वापर व्यावसायिक कामासाठी बदलण्यात ‘जय किसान’ भाजी मार्केट अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांनी फक्त सरकारी एपीएमसीमध्येच आपला माल विकावा. या बेकायदेशीर कृत्याविरोधात लढताना सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयात आणि नगर विकास विभागात विजय मिळवला आहे.”
याच वेळी राजकुमार टोपण्णावर यांनीही आपले मत मांडले. ते म्हणाले, “सध्या सहकारी विभागासह अनेक विभागांमध्ये या खासगी मार्केटची परवानगी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मार्केटच्या संचालकांनी स्वतःच सरकारी एपीएमसीमध्ये दुकानासाठी अर्ज केला आहे, यावरून हे खासगी मार्केट बंद होणार आहे, हे स्पष्ट होते. या खासगी मार्केटमुळे अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता.” हा विजय शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या संघर्षाचा परिणाम असून, ‘जय किसान’ मार्केट बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा एपीएमसीचा आधार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
याच पत्रकार परिषदेत ‘जय किसान’ मार्केटच्या मुद्द्यासोबतच बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात गणेशोत्सव महाप्रसादाच्या निर्णयावरून महानगरपालिकेत करण्यात आलेल्या ठरावावरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी यावर बोलताना सांगितले की, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गणेश महाप्रसादाची सोय करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे, पण हिंदू असूनही भाजपच्या नगरसेवकांनी त्याला विरोध करणे निंदनीय आहे. हिंदुत्वाच्या नावावर सत्तेत आलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी या चांगल्या निर्णयाला विरोध करणे निंदनीय आहे.
विघ्नहर्त्याचे कार्य निर्विघ्नपणे करण्याऐवजी भाजप सदस्यांनी त्यात विघ्न आणले आहे. सातत्याने राज्यपालांकडे निवेदन देण्याची धमकी देणाऱ्यांना आम्हीही बसभरून कार्यकर्त्यांना घेऊन राजभवनासमोर आंदोलन करू, असा इशारा देत आहोत. चांगल्या अधिकाऱ्यांना त्यांचे काम करू द्यावे.” असा इशाराही त्यांनी दिला.


