बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये आज हजारो आशा कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. ए.आय.यु.टी.यु.सी.च्या नेतृत्वाखालील आशा कार्यकर्त्यांच्या संघटनेने भव्य मोर्चा काढला.
हा मोर्चा चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने आशा कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तीन दिवस रात्रभर धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
यावेळी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षांनी त्यांच्या मागण्यांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “आम्ही बंगळूरमध्ये आंदोलन केले तेव्हा सरकारने १ एप्रिलपासून १० हजार रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते, पण अद्याप ते पूर्ण झाले नाही.” यासोबतच, ‘शैक्षणिक मूल्यांकना’च्या नावाखाली आशा कार्यकर्त्यांना कामावरून काढले जात असल्याबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
हे थांबवून सर्वांना कामावर कायम ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने दिलेले आश्वासन पाळून १० हजार रुपये मानधन त्वरित द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
या आंदोलनात राज्यभरातील सुमारे ४६ हजार आशा कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत. या सर्व आशा वर्कर्स आपापल्या जिल्हा केंद्रांवर तीन दिवसांचे रात्रभर धरणे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती आंदोलनकर्त्या आशा कार्यकर्त्यांनी दिली.




