बेळगाव लाईव्ह : गोकाक तालुक्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने जनजीवन विस्कळीत झाले असून, सुमारे २२० घरांमध्ये पाणी शिरले आहे. या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गोकाक येथील पूरग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी लोळसूर पूल आणि पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्राची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.
म्युनिसिपल हायस्कूलमध्ये उभारलेल्या मदत केंद्रात स्थलांतरित केलेल्या पूरग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. एका पूरग्रस्त नागरिकाने सांगितले की, “अचानक आलेल्या पाण्यामुळे घरातील सर्व सरकारी कागदपत्रे आणि माझ्या नातीच्या शाळेची पुस्तके वाहून गेली आहेत. सरकारने आम्हाला कायमस्वरूपी मदत करावी.”
या व्यथा ऐकून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पूरग्रस्तांना कायद्यानुसार कायमस्वरूपी मदत देण्याचे आश्वासन दिले. या केंद्रात जवळपास २०० पूरग्रस्तांना हलवण्यात आले असून, त्यापैकी दोन गर्भवती महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसडीआरएफच्या नियमांनुसार भाड्याच्या घरात किंवा स्वतःच्या घरात राहणाऱ्या सर्वांना मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जनावरांसाठी चारा बँक स्थापन करण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाला देण्यात आले आहेत. तसेच, लोळसूर पुलाच्या दुरुस्तीसाठी महसूल विभागाकडून ११ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. कॅपेसिटी बिल्डिंग फंडातून निधी मिळाल्यावर पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
कोयना धरणातून पाणी सोडल्यास अथणी आणि कागवाडमध्ये पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन त्यांनी केले. हिडकल धरणातून ३६ हजार क्युसेक पाणी सोडले जात असून, अलमट्टी धरणातही अडीच लाख क्युसेक पाणी जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय पातळीवर काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दूर केल्या जातील, असे स्पष्ट केले. तसेच, कुंभारगल्ली आणि मीट मार्केटचे स्थलांतर शक्य आहे का, याची तपासणी करून उपाययोजना करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत विविध विभागाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


