बेळगाव लाईव्ह : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे सोमवारपासून कामकाज सुरू झाले. बेळगावसह सीमा भागासाठी ही एक विशेष बाब असून, पहिल्याच दिवशी बेळगावच्या तीन नामवंत वकिलांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आपल्या व्यावसायिक सरावाला सुरुवात केली आहे.
या खंडपीठात पहिल्याच दिवशी दाखल झालेल्या एका महत्त्वाच्या खटल्याचीही चर्चा आहे. ॲड. माधव चव्हाण, ॲड. रवींद्र चव्हाण आणि ॲड. महेश्वरी कौजलगी यांनी डेक्कन स्पिनिंग मिलच्या ३९ कामगारांसाठी हा खटला विनामूल्य दाखल केला आहे. गेल्या २५ वर्षांपासून हे कामगार न्याय मिळवण्यासाठी लढा देत आहेत. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पहिल्याच दिवशी या खटल्यासाठी त्या वकिलांची कोर्टात हजेरी झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून विविध लढे आणि सत्याग्रहांनंतर या खंडपीठाला मंजुरी मिळाली. रविवारी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या खंडपीठाचे दिमाखदार उद्घाटन पार पडले.
दरम्यान, बेळगावात राहून सीमाभागातील प्रश्नांवर काम करणारे ॲड. माधव चव्हाण यांनी कोल्हापुरातच राहून या प्रश्नांसाठी अधिकाधिक काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरमध्ये सुरू झाल्यामुळे त्याचा फायदा केवळ कोल्हापूर जिल्ह्यालाच नाही,
तर बेळगाव आणि सीमा भागालाही होणार आहे. विशेषतः मराठी भाषिकांना वकिलांना आणि पक्षकारांना याबाबतीत अनेक खटले दाखल करणे सोपे होणार आहे. त्यामुळे सीमा भागातील लोकांना जलद आणि सोप्या पद्धतीने न्याय मिळवणे शक्य होणार आहे.
कोल्हापूर मध्ये बॉम्बे हायकोर्टाचे खंडपीठ सुरू झाल्याने बेळगाव शहराला देखील ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे कारण बेळगाव शहराच्या दीडशे किलोमीटर अंतरावर तीन उच्च न्यायालय आली आहेत याचा फायदा बेळगाव सह सीमा भागातील वकिलांना होणार आहे. कर्नाटक बेंगळुरू उच्च न्यायालयाचे धारवाड खंडपीठ याशिवाय गोवा हायकोर्ट आणि आता बॉम्बे हायकोर्टाचे कोल्हापूर सर्किट बेंच अशी तीन उच्च न्यायालयात दीडशे किलोमीटरच्या परिघात आल्याने सीमा भागातील वकिला नाही याचा फायदा होणार आहे आणि ही एक ऐतिहासिक बाब आहे ज्यामुळे बेळगाव देशातील असे एकमेव शहर बनले आहे ज्याच्या सभोवताली दीडशे किलोमीटर अंतरावर तीन उच्च न्यायालयाची खंडपीठ आहेत.


