बेळगाव लाईव्ह : शहरातील अनेक अनधिकृत ब्युटी पार्लर, स्किन केअर सेंटर आणि रुग्णालयांवर आरोग्य अधिकाऱ्यांनी धाडी टाकून तपासणी केली.
या धाडीमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत आणि अकुशल व्यक्तींद्वारे ही केंद्रे चालवली जात असल्याचे उघड झाले आहे. शहरात एकूण ४ अनधिकृत रुग्णालये, क्लिनिक आणि ब्युटी सेंटर्स सील करण्यात आली आहेत, तर ७ पार्लर व रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी आरपीडी, टिळकवाडी, कॅम्प, शाहूनगर, रविवार पेठ, अनगोळ, वडगाव आणि सदाशिवनगर यांसारख्या भागांत धाडी टाकल्या. त्यावेळी कारवाईच्या भीतीने अनेक ब्युटी पार्लर्स बंद करून संचालक पसार झाल्याचे दिसून आले.
याबाबत नागरिकांनी अनधिकृत ब्युटी पार्लर, स्किन केअर सेंटर आणि सौंदर्यप्रसाधनांच्या नावाखाली चालणाऱ्या रुग्णालयांची माहिती मोकळेपणाने द्यावी, असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच, नागरिकांनी अशा अनधिकृत ठिकाणी जाऊन आपले आरोग्य आणि पैसा वाया घालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
याविषयी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी महम्मद रोशन म्हणाले, “छोटे दुकानदारही उपचार देत असल्याच्या तक्रारी डर्मेटोलॉजिस्ट असोसिएशन आणि विविध डॉक्टरांनी केल्या होत्या.
या तक्रारींवरून आम्ही अहवाल मागवला आणि धाडी टाकण्यासाठी ३० पथके तयार केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नियमबाह्य काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. आम्ही कोणालाही लोकांच्या जीवाशी खेळू देणार नाही.” असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.



