बेळगाव लाईव्ह : कर्नाटक प्रशासकीय न्यायाधिकरणच्या खंडपीठासाठी २०१४ मध्ये बेळगावात झालेल्या आंदोलनादरम्यान १४ वकिलांवर दाखल करण्यात आलेले फौजदारी खटले मागे घेण्यास येथील दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयाने परवानगी दिली आहे. यामुळे संबंधित वकिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप करत मार्केट पोलिसांनी १४ वकिलांवर गुन्हे दाखल केले होते. यामध्ये रावसाहेब पाटील, मारुती कामाण्णाचे, बी. जे. गंगाई, आर. सी. इंगळे, एस. एन. पत्तार, निंगनगौडा पाटील, पी. एस. रंगोली, आदिल नदाफ, प्रभाकर पवार, एम. एल. माविनकट्टी, ए. ए. मुल्ला, प्रभू यत्तनट्टी, सचिन शिवन्नवर आणि शिवाजी शिंदे यांचा समावेश होता.
या वकिलांनी हे खटले मागे घेण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे खटले मागे घेण्याचे निर्देश देण्यात आले.
त्यानंतर सहायक अभियोजक महांतेश चलकोप्पा यांनी खटला चालवणाऱ्या न्यायालयातून हे खटले मागे घेण्याची परवानगी मागितली. न्यायाधीश सी. गुरुप्रसाद यांनी ही मागणी मान्य करत खटले मागे घेण्यास परवानगी दिली.


