बेळगाव लाईव्ह: बेळगावमध्ये झेप्टो कंपनी आणि त्यांच्या डिलिव्हरी कामगारांमधील पगारावरून सुरू असलेल्या वादात तात्काळ हस्तक्षेप करावा आणि कामगारांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करत बेळगाव शहरातील झेप्टो कंपनीच्या कामगारांनी आज आंदोलन छेडून कामगार खात्याच्या बेळगाव उपायुक्तांना निवेदन सादर केले.
पगाराच्या समस्येसह अन्य मागण्यासंदर्भात बेळगाव शहरातील झेप्टो कंपनीच्या कामगारांनी आज शनिवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन छेडून जोरदार निदर्शने केली. त्यानंतर मोर्चाने कामगार खात्याच्या उपायुक्तांच्या कार्यालयावर जाऊन आपल्या मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.
बेळगावमध्ये झेप्टो कंपनी आणि त्यांच्या डिलिव्हरी कामगारांमधील पगारावरून सुरू असलेल्या वादात आपण तात्काळ हस्तक्षेप करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आम्ही युनायटेड फूड डिलिव्हरी पार्टनर्स युनियन (युएफडीपीयू) या भारतातील शोषित डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचा संघटित आवाज आहोत. आम्ही यापूर्वी बेळगावमध्ये कामगारांच्या अनेक समस्या घेऊन आलो आहोत आणि सध्याच्या समस्येबद्दल कामगार विभागाशी संपर्क साधला आहे.
कालपासून झेप्टोचे कामगार संपावर आहेत. त्यांच्या पगारामध्ये बदल करण्यात आला असून तो बदल एकतर्फी आहे. हा बदल करताना कामगारांचे मत विचारात घेतलेले नाही. आम्ही कामगार विभागाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आणि कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्याची विनंती करतो, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद असून निवेदनात कामगारांवर होत असलेल्या अन्यायाची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.
सदर निवेदनामध्ये प्रति किलोमीटर 20 रुपये निश्चित पगार : सध्याची पगार पद्धत मनमानी आणि अन्यायी आहे. कमाईमध्ये पारदर्शकता आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला प्रति कि.मी. 20 रुपये प्रमाणित पगार द्यावा. फॉरवर्ड राईड 25 रुपये / रिझर्व्ह राईड 20 रुपये मिळावेत.
अपघातांना त्वरित प्रतिसाद देण्याबरोबरच गुगल मॅप अंतरातील तफावतींचे निराकरण दिले जावे. अन्यायी आयडी ब्लॉकिंग आणि छळ बंद करावा. केवळ कामगारांच्या उपस्थितीतच पगार सुधारणा केली जावी. कामगारांना आरोग्यदायी आणि स्वच्छता सुविधा दिल्या जाव्यात वगैरे मागण्या देखील नमूद आहेत.


