बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (व्हीटीयू) 25 व्या वार्षिक दीक्षांत सोहळ्याचा पहिला भाग येत्या शुक्रवार दि. 4 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता एपीजे अब्दुल कलाम सभागृह ‘जन संगम’ व्हीटीयू, बेळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे.
शहरांमध्ये आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्हीटीयूच्या उपकुलगुरूंनी उपरोक्त माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलगुरू थावरचंद गहलोत हे या दीक्षांत सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवतील. यावेळी कर्नाटक सरकारचे उच्च शिक्षण मंत्री आणि विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. एम. सी. सुधाकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असतील.
पद्मश्री पुरस्कार विजेते आणि भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सुद हे प्रमुख पाहुणे या नात्याने दीक्षांत सोहळ्यात भाषण देतील. याप्रसंगी व्हीटीयू कडून भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव डॉ. व्ही. नारायणन, पद्मश्री पुरस्कार विजेते एक्सेल इंडियाचे संस्थापक प्रशांत प्रकाश आणि अट्रिया विद्यापीठाचे बंगळुरूचे कुलगुरू सी. एस. सुंदर राजू या तीन मान्यवरांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरवण्यात येणार आहे.
व्हीटीयूच्या 25 व्या वार्षिक दीक्षांत सोहळ्याच्या भाग 1 मध्ये विद्यापीठाकडून विद्यार्थी विद्यार्थिनींना पुढील प्रमाणे पदव्या दिल्या जाणार आहेत. 38154 अधिक 20707 (स्वायत्त महाविद्यालये) अशा एकूण 58861 जणांना बी.ई. पदवी, 117 जणांना बी.टेक. पदवी, 10 जणांना बी.प्लान पदवी, 806 अधिक 234 (स्वायत्त महाविद्यालये) अशा एकूण 1040 जणांना बी.आर्क. पदवी आणि 24 जणांना बीएससी (ऑनर्स) पदवी अशा एकूण 60,052 पदव्या सोहळ्यात प्रदान केल्या जाणार आहेत.
पदवी स्वीकारणाऱ्या सर्वात प्रतिभावंत सुवर्णपदक विजेत्या पहिल्या पाच विद्यार्थी -विद्यार्थिनींमध्ये नम्रता सी. प्रभू (सिव्हिल इंजिनिअरिंग) ऑक्सफर्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेंगलोर (13 सुवर्ण पदके), नव्याश्री गणपीशेट्टी (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग) आरव्ही इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (11 सुवर्ण पदके), कार्तिक एल. (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) बेंगलोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेंगलोर (7 सुवर्ण पदके),
कवना ए. (इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग) जीएसएसएसएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर वुमन म्हैसूर (7 सुवर्णपदके), मोहिनी व्ही. (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग) दयानंद सागर अकादमी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट बेंगलोर (6 सुवर्णपदके), जान्हवी के. (इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग) आरएनएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेंगलोर (5 सुवर्णपदके) यांचा समावेश आहे.


