बेळगाव लाईव्ह: दिनांक 4 जुलै 2025 रोजी कै. श्री. पांडुरंग शांताराम हेब्बाळकर(तिवोली खानापूर) यांचा स्वर्गवास झाला. आज आपल्या भावाच्या जाण्याला अकरा दिवस झाले. त्यानिमित्ताने….
चंदना परी देह झिजविला, कष्टातुनी संसार फुलविला! शून्यातून निर्माण केल विश्व! मनी होता प्रेमळपणा कधि न दाखवला मोठेपणा! वटवृक्ष गेला कोसळून, सावली गेली हरवुनी! नाही उरली साथ, आम्हा तुमची, आम्हाला पोरक करून गेलात!.
पांडुरंग शांताराम हेब्बाळकर याचा जन्म दिनांक 10-03-1970 रोजी निवोली गावातील साधारण कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण गावातच झाले तर माध्यमिक शिक्षण गुंजी या ठिकाणी झाले. वडील प्रगतशिल शेतकरी त्याच बरोबर गावचे पंच व दुधाचा व्यवसाय करायचे त्यामुळे त्यांचे सतत खानापूरला येणे-जाणे असायचे. त्याना वाटायचे की माझी मुल देखील खुप शिकावीत म्हणून त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले. पांडुरंग हेब्बाळकर यांचे पदवी पूर्ण शिक्षण गोगटे कॉलेज बेळगाव येथे झाले. त्यानंतर त्यानी चिर्ल्डन फिल्म सोसायटी द्वारे महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम केले. त्यानंतर ते पुन्हा गावाकडे आले. घरी वडिलांचा दुध व्यवसाय त्यानी चालविला व खेड्यातील गरिब जनतेचे संघटन केले. गुंजी परीसरातील लोक त्याना आज सुध्दा पांडु गवळी म्हणूनच ओळखायचे, दुधाचा व्यवसाय करता करता लोकांचाही संपर्क वाढला, त्यातच त्यानी 2003 मध्ये LIC चे विमा प्रतिनिधी झाले.
एल आय सी मध्ये सुद्धा त्यानी आपला चांगला स्वभाव व गुणांमुळे एक विश्वासु विमा प्रतिनिधी अशी आपली छाप पाडली. 2006 पासून ते आजपर्यंत त्यानी शतकवीर विमा प्रतिनिधी तसेच तिन वेळा M.D.RT प्रतिनिधी म्हणून कार्य केले.

ही त्यांची कामगिरी वाखान्याजोगी आहे, कारण आजच्या युगात विमा कंपनीमध्ये काम करणे म्हणजे एक दिव्यच आहे. लोकांचा विश्वास संपादन करणे हे तुलाच जमले कारण तुमचा स्वभावच याला कारणीभुत, समाजात वावरताना इतराशी कसे बोलावे कसे वागावे यांची शिकवण आम्हाला तुमच्या कडूनच मिळाली. याचीच पोच पावती तुम्हाला समाजाकडून मिळाली.
2007 मध्ये तिवोली गावची ग्राम देवता लक्ष्मी यात्रा कमिटी सेक्रेटरी पदाची जबाबदारी तुम्ही उत्तम रित्या बजावली. समाजात वावरताना जीवनभर कोणाकडूनही वाईट म्हणवून घेतला नाही. कुटुंब, आई, वडील, भाऊ पै पाहुने व भावंडे यांच्याशी वावरताना स्वताचा आदर्श निर्माण केलात, पण असे जगताना स्वता जगने विसरलात. तुमचे घरकुलाचे स्वप्न अर्ध्यावर राहीले मुलाना तुम्ही उच्चशिक्षित केलात. पण त्याच्या हातून सेवा करून घेवू शकला नाहीत. पण शेवटी काय म्हणावे जे आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे काही चालेना.
भाऊ तु गेल्याचे दुःख हे आम्हांसाठी न विसरणारे आहे. पण तु दिलेली शिकवण आम्ही आत्मसात करू, हीच तुझ्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रध्दांजली.
-महेश गो. हेब्बाळकर शिक्षक (तिवोली)




