बेळगाव लाईव्ह : कंग्राळी खुर्द गावाच्या मुख्य शेतवाडीशी जोडणाऱ्या काळा कट्टा पुलावर दरवर्षी पावसात माती वाहून जाण्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यावर्षीही अशीच स्थिती निर्माण झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवेदनावर तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी यशवंत कुमार यांनी तातडीने पाहणी करून पुलाच्या काँक्रिटीकरणाचे आश्वासन दिले आहे.
कंग्राळी खुर्द गावातील काळा कट्टा पुल हा गावातील मुख्य शेतवाड्याला जोडणारा महत्त्वाचा आणि जुना मार्ग आहे. मात्र दरवर्षी पावसाळ्यात पुलावरची माती वाहून जात असल्याने शेतकऱ्यांची ये-जा ठप्प होते. अगदी पंधरा दिवसांपूर्वी देखील जोरदार पावसामुळे या पुलावरील माती वाहून गेली आणि शेतकरी अडकल्याची स्थिती निर्माण झाली होती.
तत्काळ उपाययोजना करत ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरूपात माती टाकून मार्ग सुरू केला. मात्र ही केवळ तात्पुरती सोय असल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी तातडीने बैठक घेऊन तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी यशवंत कुमार यांना परिस्थितीची माहिती दिली.
या निवेदनानंतर ईओ यशवंत कुमार यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांनी भोगत असलेल्या अडचणींचा आढावा घेतला आणि त्या ठिकाणी पुलावरून पाणी पास होण्यासाठी पाईप घालून काँक्रिट रस्त्याचे काम तातडीने करण्याचे आश्वासन दिले. या कामासाठी लागणारा खर्च “निधी टू” या योजनेंतर्गत मंजूर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पाहणी दरम्यान ग्रामपंचायत सदस्य राकेश पाटील, वैजू बेन्नाळकर, विनायक कम्मार, महेश धामणेकर, तसेच ठेकेदार महेश पाटील, ग्रामपंचायत पीडीओ गोपाल नाईक, आणि गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रशांत पाटील, यल्लाप्पा पाटील आणि रमेश कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचे स्वागत केले आणि लवकरात लवकर हे काम हाती घेण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.



