बेळगाव लाईव्ह : बंद असलेल्या चौथ्या रेल्वे गेट्सच्या वाहतुकीचा भार पडलेल्या तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिज वरील रस्त्याची सध्याच्या पावसामुळे खड्डे पडून वाताहत झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे त्रस्त वाहन चालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आज ब्रिजच्या रस्त्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी रेखाटून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे अभिनव आंदोलन केले. त्याचप्रमाणे येत्या दोन-चार दिवसात सदर रस्ता दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
रेल्वे खात्याकडून अनगोळ येथील चौथ्या रेल्वे गेट अंडरपास रस्त्याचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे त्यामुळे अनगोळ आणि उद्यमबाग औद्योगिक वसाहतीला जोडणारा एकमेव प्रमुख मार्ग बंद झाला आहे. अंडरपासच्या कामामुळे त्या मार्गावरील वाहतूक टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिज मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे या ब्रिज वरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिज रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाचे पितळ ब्रिजच्या उद्घाटनानंतर अवघ्या वर्षभरात उघडे पडले होते. या पद्धतीने आधीच निकृष्ट बांधकाम असलेल्या या रस्त्यावर आता चौथ्या रेल्वे गेट येथील वाहतूक वळविण्यात आली असल्यामुळे सध्याच्या पावसात रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील डांबरीकरण उखडून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गंभीर अपघाताला निमंत्रण देणारे हे खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा अशी वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि वाहन चालकांनी आज सोमवारी सकाळी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली ‘गांधीगिरी’ करत एक अभिनव आंदोलन छेडले.

माजी नगरसेवक गुंजटकर आणि उपस्थित सर्वांनी ‘मी रोड बोलतोय, मला वाचवा’ या शीर्षकाची पत्रके वाटून प्रशासन, रेल्वे खाते आणि राष्ट्रीय महामार्ग खात्याचा निषेध केला. त्याचबरोबर ब्रिजच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसभोवती रांगोळी रेखाटून प्रशासनाचे लक्ष वेधताना सदर रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी केली. यावेळी बेळगाव लाईव्हशी बोलताना माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी आजच्या आंदोलनाचा उद्देश थोडक्यात स्पष्ट केला.
पावसाळा तोंडावर असताना चौथ्या रेल्वे गेट अंडरपासचे काम हाती घेण्याचा निर्णय हे चुकीचे पाऊल असून त्यामुळे त्या मार्गावरील संपूर्ण वाहतुकीचा भार तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर वर ब्रिजवर पडला आहे. सध्याच्या पावसात ब्रिजच्या रस्त्यावर इतके धोकादाय खड्डे निर्माण झाले आहेत की वाहने चालवणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे कोणत्याही क्षणी एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागत आहेत. सदर रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती केली जावी यासाठी आज आम्ही खड्ड्यानभोवती रांगोळी काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगून या आमच्या आंदोलनाची दखल घेऊन येत्या दोन-चार दिवसात खड्डे बुजून या रस्त्याची व्यवस्थित दुरुस्ती झाली नाही तर आम्ही उपोषणाच्या स्वरूपात उग्र आंदोलन छेडू, असा इशारा माजी नगरसेवक गुंजटकर यांनी दिला.


