बेळगाव लाईव्ह : सरकारी कार्यालयांमध्ये कामं कशी चालतात, याचा धक्कादायक नमुना बेळगावमध्ये समोर आला आहे! जिथे जबाबदार अधिकारी खुर्चीवर असणं अपेक्षित आहे, तिथे एक लिपिकाचा मुलगा थेट उपनिबंधकाच्या आसनावर बसल्याचे आढळून आले आहे. या गैरप्रकारामुळे बेळगाव उत्तर उपनिबंधक कार्यालयाचा गलथान कारभार उघड झाला आहे.
प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कार्यालयात पोहोचले असता, राजशेखर अळगोडे नावाचा हा तरुण, जो कार्यालयातील एका लिपिकाचा मुलगा आहे, तो चक्क उपनिबंधकाच्या खुर्चीवर बसून ‘लाॅगिन’ वापरत काम करत होता. उपनिबंधक कार्यालयात उपस्थित नसतानाही हा तरुण हा महत्त्वाचा कारभार बेकायदेशीरपणे सांभाळत असल्याचे स्पष्ट झाले.
हा प्रकार उघडकीस येताच, उपनिबंधक करिबसनगौडा अचानक घटनास्थळी प्रकट झाले. त्यांनी माध्यमांसमोर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे स्पष्टीकरण अत्यंत तोकडे होते.
वडिलांच्या वयोमानामुळे मुलगा मदतीला येतो, असे त्यांनी सांगितले खरे; पण तो आपल्या खुर्चीवर बसून काम करत होता, याची आपल्याला कल्पना नव्हती, असे सांगून त्यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.
या गंभीर घटनेची दखल घेत, जिल्हा निबंधक महांतेश यांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र, या घटनेमुळे सरकारी कार्यालयांमधील सुरक्षा, गोपनीयतेचे नियम आणि अनधिकृत व्यक्तींचा हस्तक्षेप यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


