विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

0
5
 belgaum

बेळगाव लाईव्ह : विनंती थांब्यावर बस न थांबवण्याच्या मनमानीसह परिवहन बस वाहक आणि चालकाच्या अर्वाच्य भाषेतील उद्धट वर्तनाच्या निषेधार्थ बेळगाव शहराजवळील कोंडसकोप गावातील संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी रस्त्यावरील वाहतूक रोखून रास्तारोको आंदोलन केल्याची घटना आज बुधवारी सकाळी कोंडसकोप जवळ पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घडली.

बेळगाव शहराजवळील कोंडसकोप गावासाठी सकाळी 8:30 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता परिवहन मंडळाची बससेवा आहे. मात्र अशा आवश्यकता नसलेल्या वेळी बस गावात येत असल्यामुळे ती बऱ्याचदा रिकामीच माघारी जात असते. त्यामुळे गावातील शाळकरी व कॉलेजच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींना राष्ट्रीय महामार्गावरून बेळगावकडे ये-जा करणाऱ्या अन्य गावांच्या बसेस वर अवलंबून राहावे लागते.

तथापि बहुतांश बसेस कोंडसकोप गावच्या विनंती थांब्याच्या ठिकाणी थांबत नसल्यामुळे विद्यार्थी -विद्यार्थिनींना शाळा कॉलेजेसना जाण्यास विलंब होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या खेरीज इतर गावच्या बसगाड्यांचे चालक व वाहक कोंडसकोप गावच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींशी अर्वाच्य भाषेत उद्धट वर्तन करत असतात. कांही उद्दाम बसवाहक आणि चालक तर बस थांब्याच्या ठिकाणी थांबलेल्या मुला -मुलींना हाताने टा टा करून हिणवून आपली बस पुढे दामटत असतात.

 belgaum

तासंतास बसच्या प्रतीक्षेत थांबावे लागणे तसेच परिवहन बस चालक आणि वाहकांच्या मनमानी उद्धट वर्तनासंदर्भात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे संतप्त झालेल्या कोंडसकोप गावच्या जवळपास 50 हून विद्यार्थी -विद्यार्थिनींसह पालकांनी आज मंगळवारी सकाळी पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले.

त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कांही काळ ठप्प होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या परिवहन मंडळ व पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी संतप्त विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालकांची समजूत काढली. तसेच त्यांनी कोंडसकोप गावच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी विनंती थांब्याच्या ठिकाणी बसेस थांबवल्या जातील असे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

यावेळी बेळगाव लाईव्हशी बोलताना सूर्यकांत पाटील, श्रुती पाटील वगैरे कोंडसकोप येथील विद्यार्थी -विद्यार्थिनींनी परिवहन बस चालक व वाहकांच्या गैरवर्तनाची माहिती देऊन तीव्र संताप व्यक्त केला. तसेच आपल्या गावच्या विनंती बस थांब्याच्या ठिकाणी बसेस थांबून परिवहन मंडळाने आमची गैरसोय दूर करावी अशी मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.