बेळगाव लाईव्ह :मातृभाषेतून शिकलो म्हणून विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नये, मराठी माध्यमातून शिकलेलली मुले ही प्रभावी इंग्रजी बोलू शकतात ,तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे उच्च पदावर कार्य करून आपला ठसा उमटू शकतात, याची बरीचशी उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर असुन त्यांचा आदर्श आजच्या विध्यर्थानी घ्यावा, असे प्रतिपादन कॅप्टन नितीन धोंड यांनी केले.
ते ओलमणी राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगाव यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमातून दहावी उत्तीर्ण झालेल्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांच्या रोख पारितोषिक वितरण, व गुणगौरव कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी भाषा प्रेरणा मंच चे अध्यक्ष प्रा डॉ गोपाळ पाटील हे होते.
प्रारंभी प्रेरणा मंच चे सदस्य डी बी पाटील यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. प्रेरणा मंचचे सदस्य शिवाजी हसनेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तसेच सुरेश पाटील, मधू पाटील, यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर राजर्षी शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक सी. एस. कदम यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कॅप्टन नितीन धोंड यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले प्रतिमा पूजन, तसेच राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख प्रा .डॉ .मनीषा नेसरकर यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

यावेळी खानापूर तालुक्यात मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या अनुक्रमे पहिल्या 14 विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक तसेच प्रशस्तीपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्रा .डॉ मनीषा नेसरकर म्हणाल्या , विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठी ऊर्जा शक्ती असते .त्याला योग्य दिशा देणे हे समाज व शिक्षकांचे कर्तव्य असून या शक्तीचा वापर भविष्यात योग्य कामासाठी व रचनात्मक कार्यासाठी झाला पाहिजे.
विद्यार्थ्यांना अगदी प्राथमिक शाळेपासूनच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती दिल्यास त्यांना योग्य दिशा मिळेल, व ते जीवनात यशस्वी होतील असे विचार त्यानी व्यक्त केले. पालकानी आपल्या मुलाना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना पुढे शिकण्यास पाठवावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सी.एस .कदम यांचेही समयोत भाषण झाले.तर प्रा .डॉ गोपाळ पाटील यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ओलमणी हायस्कूलचे उपाध्यक्ष नारायण सुतार, प्रेरणा मंच चे सदस्य परशराम कंगराळकर, मारुती लोहार, आर .के .निलजकर, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी भाषा प्रेरणा मंच चे सचिव ,अभियंता अरुण कदम यांनी केले तर आभार डी .बी. पाटील यांनी मांनले .



