बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि नगरसेवकाच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या कायदेशीर चाचपणीच्या टप्प्यावर आहे. खाऊ कट्टा प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेला तात्पुरता दिलासा महत्त्वपूर्ण ठरला असून ‘खाऊ कट्टा’शी संबंधित गाळ्यांच्या प्रकरणावरून महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांना अपात्र ठरवण्याच्या प्रादेशिक आयुक्तांच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांच्या तक्रारीवर कार्यवाही करत प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टेनवर यांनी दोघांना अपात्र ठरवले होते. त्या निर्णयाविरोधात नगर विकास विभागात अपील दाखल करण्यात आले होते. मात्र, विभागाच्या सचिव दीपा चोळण यांनी प्रादेशिक आयुक्तांचा निर्णय योग्य ठरवत ते कायम ठेवला.
त्यामुळे पवार आणि जाधव यांची अपात्रता पुन्हा स्पष्ट झाली होती. या संपूर्ण प्रकरणात पवार आणि जाधव यांनी निवडणुकीपूर्वी ‘खाऊ कट्टा’तील काही गाळे आपल्या पत्नींच्या नावे घेतल्याचे स्पष्ट झाले होते.

निवडून आल्यानंतर ते गाळे नगरपालिकेकडे परत करणे आवश्यक होते, मात्र तसे न केल्यामुळे महानगरपालिकेचा अप्रत्यक्ष फायदा घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी न्यायालयाकडून स्थगिती मिळेल, असा विश्वास यापूर्वीच व्यक्त केला होता. तो खरा ठरला असून सध्या न्यायालयीन आदेशानुसार सदस्यत्व रद्दीचा निर्णय अमलात आलेला नाही. त्यामुळे दोन्ही लोकप्रतिनिधींना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
एकूणच खाऊ कट्टा प्रकरणावर सध्या उच्च न्यायालय नगर विकास खाते महापालिका यामध्ये वातावरण ढवळून निघाले आहे


