बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य हौशी ज्युडो संघटनेच्या आश्रयाखाली बेळगाव जिल्हा हौशी ज्युडो संघटनेतर्फे येत्या शुक्रवार दि. 25 ते रविवार दि. 27 जुलै 2025 या कालावधीत बेळगाव शहरात पहिल्या कर्नाटक खुल्या राज्यस्तरीय ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कर्नाटक युवा सबलीकरण व क्रीडा खात्याच्या बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलच्या ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील यांनी दिली.
शहरात आज मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. सदर राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धा शहरातील कॉलेज रोडवरील गांधीभवन येथे भरविण्यात येणार आहे असे सांगून रोहिणी पाटील यांनी स्वतःबद्दल माहिती देताना ज्युडोमध्ये मी राष्ट्रीय पातळीवर कर्नाटक राज्याचे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मी सुवर्णपदक आणि कांस्यपदक जिंकले आहे. त्यानंतर प्रशिक्षक पदासाठी अभ्यासक्रम पूर्ण करून मी सध्या कर्नाटक सरकारच्या युवा सबलीकरण व क्रीडा खात्याच्या बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये ज्युडो प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे, असे सांगितले.
आमच्या स्पोर्ट्स होस्टेलमध्ये जवळपास शंभर -एक मुलं-मुली ज्युडोचे प्रशिक्षण घेत असून माझ्यासह ज्युडो प्रशिक्षिका कुतुजा मुल्तानी आम्ही दोघी त्यांना प्रशिक्षण देतो. सध्या आम्हाला जे सरकार आणि राज्यस्तरीय संघटनेकडून जसे प्रोत्साहन मिळत आहे तसे प्रोत्साहन यापूर्वी कधी मिळले नव्हते. राज्य ज्युडो संघटनेचा आम्हाला मोठा पाठिंबा मिळत असून त्यांचा पाठिंबा आणि सहकार्यामुळेच बेळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.

या स्पर्धेमुळे ज्युडो खेळाची लोकप्रियता आणखी वाढवून अधिकाधिक ज्युडो खेळाडू निर्माण होण्यास मदत होणार आहे असे सांगून ज्युडो हा फक्त एक खेळ नसून तो मुला मुलींसाठी एक आत्मसंरक्षणाची कला आहे. राज्य संघटनेच्या सहकार्याने राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार ज्युडो खेळाडू निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे, असे रोहिणी पाटील यांनी पुढे स्पष्ट केले.
ज्युडो प्रशिक्षिका कुतुजा मुल्तानी यांनी देखील यावेळी आपल्याबद्दल थोडक्यात माहिती देताना मी राष्ट्रीय स्तरावर सात सुवर्णपदके मिळवली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये माझा सहभाग होता. मी आणि रोहिणी पाटील आम्ही दोघेही याच स्पोर्ट्स हॉस्टेलमधून ज्युडोचे धडे घेऊन आज याच ठिकाणी प्रशिक्षक म्हणून काम करत आहोत असे सांगून राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. सदर राज्यस्तरीय स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली असून स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांची जेवणखाण्याची सोय विनामूल्य केली जाणार आहे. त्याचप्रमाणे दूरच्या परगावाहून येणाऱ्या खेळाडूंची राहण्याची सोय देखील मोफत केली जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. याप्रसंगी बेळगाव जिल्हा हौशी ज्युडो संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश मुगळी, बसवराज कडली, संयुक्त सचिव ॲड. पूजा गावडे आदींसह अन्य सदस्य उपस्थित होते.



