बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती येथील यल्लम्मा मंदिरात शुक्रवारी एका भक्ताला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली.
देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडत असताना ही घटना घडली. शुक्रवार असल्यामुळे यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी धारवाडचे श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष अण्णाप्पा दिवटगी आपल्या पत्नीसह आले होते. देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडण्याच्या मार्गावर त्यांचे बाळ रडू लागले.
बाळाला शांत करण्यासाठी पिशवीत खाऊ शोधत त्यांची पत्नी तिथेच थांबली होती. यावेळी, मंदिराच्या एका होमगार्डने “येथे थांबू नका, बाहेर जा” असे म्हणून त्यांना हाकलून लावले. मंदिराच्या बाहेर एका दुकानात बाळ आणि आई बसले असतानाही, सवदत्ती पोलिस ठाण्याचे कर्मचारी नागनगौडा आणि मंदिराच्या होमगार्डने त्यांना उठून जाण्यास सांगितले, असा आरोप पीडितेने केला आहे. हा त्रास सहन न झाल्याने तिने तात्काळ पतीला याची माहिती दिली.
पत्नीने पोलिसांच्या गैरवर्तनावर प्रश्न विचारताच, पोलिस कर्मचाऱ्याने अचानक लाठीने अण्णाप्पाला मारहाण केली, ज्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मारहाण झाल्यानंतर पोलिस कर्मचारी आणि होमगार्डने त्यांच्याशी वाद घातला, मात्र त्यांना रुग्णालयात नेण्यास नकार दिला.
अखेर, तेथील स्थानिक भक्तांनी मारहाण झालेल्या अण्णाप्पा यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अण्णाप्पा दिवटगी यांनी सवदत्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस कर्मचारी आणि मंदिरातील होमगार्डच्या या वर्तनामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.



