बेळगाव लाईव्ह : उद्यमबाग येथील बेम्को कंपनी समोरील बेळगाव -खानापूर रस्त्यावरील बस थांब्याची वर्ष झाले अद्यापही उभारणी केली नसल्यामुळे उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील सर्वसामान्य कामगारवर्गाची मोठी गैरसोय होऊन त्यांना त्रास होत आहे. तेंव्हा सदर बस थांब्याची ताबडतोब उभारणी करण्यात यावी अन्यथा आपल्याला उपोषणाचे अस्त्र उपसावे लागेल, असा इशारा उद्यमबाग येथे नामांकित उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी दिला आहे.
उद्यमबाग येथील बेम्को कंपनी समोरील बेळगाव -खानापूर रस्त्यावरील बस थांबा असलेल्या ठिकाणी आज शनिवारी सकाळी ते बेळगाव लाईव्हशी बोलत होते. ते म्हणाले की या ठिकाणी असलेला बस थांबा शेजारी चाललेल्या बांधकामावेळी कोसळून इतिहास जमा झाला आहे. त्यावेळी सदर थांब्याचे महत्त्व अधोरेखित करत मी बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून आवाज देखील उठवला होता आणि सदर बस थांबा अबाधित ठेवावा अशी मागणी केली होती. उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत बेळगाव शहर उपनगरातून मोठ्या प्रमाणात गरीब सर्वसामान्य कामगारवर्ग कामासाठी येत असतो. या परिस्थितीत बस थांबा कोसळल्यामुळे बस सेवेवर अवलंबून असणाऱ्या कामगारांची विशेष करून महिलावर्गाची थांब्याच्या ठिकाणी निवारा नसल्यामुळे मोठी गैरसोय होत असते. तेंव्हा सदर बस थांबा उभारणे अत्यंत गरजेचे असताना दुर्दैवाने गेल्यावर्षभरापासून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सध्याचे पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता माझी प्रशासनाला विनंती आहे की बेम्को कंपनी समोरील बेळगाव -खानापूर रस्त्यावरील बस थांबा ताबडतोब उभारण्याचा आदेश देऊन सामान्य नागरिकांना न्याय द्यावा. तसेच येत्या महिन्याभरात जर या मागणीची पूर्तता झाली नाही तर मला नाईलाजाने उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
उद्यमबाग मधील उद्योजक असल्यामुळे बेळगाव -खानापूर मार्गाशी माझा जवळपास 25-30 वर्षापासूनचा निकटचा संबंध आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणाचा मी साक्षीदार आहे. मोठ्या प्रमाणात रहदारी असणाऱ्या या मार्गाची जनहितार्थ चांगल्या पद्धतीने देखभाल व्हावी यासाठी मी आणि माझे सहकारी सातत्याने प्रयत्नशील असतो. रस्त्यावरील खड्डे चांगल्या पद्धतीने शाश्वत बुजले जावेत यासाठी पेव्हर्स घालून ते बुजवण्याची संकल्पना राज्यामध्ये मी माझ्या सहकाऱ्यांसमवेत पहिल्यांदा बेळगावमध्ये यशस्वीरित्या राबविली. त्यानंतर आजतागायत राज्यभरात सरकारकडून त्याचे अनुकरण केले जात आहे, उद्योजक गुरव यांनी पुढे स्पष्ट केले.

बेळगाव -खानापूर रस्त्यावरील वाहतुकीचा वाढता ताण वाढत आहे हा ताण कमी करण्यासंदर्भात बोलताना अप्पासाहेब गुरव यांनी सदर मार्गावरील ताण कमी करायचा असेल तर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करून लवकरात लवकर हलगा मच्छे बायपास रस्ता कार्यान्वित करावा त्याचप्रमाणे इंडाल फॅक्टरी ते बाचीपर्यंतचा रस्ता उत्तम दर्जाचा करावा. हे जर झाले तर बेळगाव शहराला तात्काळ रिंग रोड ची गरज भासणार नाही असे मत व्यक्त केले. बेम्को कंपनी जवळील चौकातील बंदावस्थेत असलेल्या सिग्नल बद्दल देखील त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वाहतूक कोंडी आणि अपघाताची शक्यता लक्षात घेऊन आम्ही या चौकामध्ये सिग्नलची उभारणी करावी अशी मागणी केली. त्यानुसार सिग्नल उभारण्यात आले, मात्र ते अल्पावधीत बंद पडले. त्याकडेही अद्याप पर्यंत लक्ष देण्यात आलेले नाही.
सरकारच्या या कार्यप्रणालीचे सखेदाश्चर्य वागते कारण जनतेच्या पैशातूनच सिग्नल वगैरे सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. जर त्यांचा योग्य रीतीने उपयोगात होत नसेल सरकार जनतेचा पैसा पाण्यात घालत आहे असाच होतो. याला कारणीभूत आपण सर्वसामान्य नागरिक देखील आहोत. तेंव्हा शहरवासीयांनी या संदर्भात नागरी हक्कांचे संरक्षण करत परदेशातील नागरिकांचा आदर्श घेऊन नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असेही उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी शेवटी स्पष्ट केले.


