बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सुमारे तीन राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गांमध्ये रूपांतर करण्यासोबतच बेळगाव-बागलकोट जिल्ह्यांतून जाणाऱ्या चारपदरी रस्त्यात सुधारणा करण्यासंदर्भात सुमारे १७७५ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवण्याकरिता बेळगावचे खासदार आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या नवीन संसद भवन कार्यालयात भेट घेऊन विनंती केली.
जांबोटी-रबकवी (रा.म. ५४), रायचूर-भाटी (रा.म. २०) रस्ता दुहेरीवरून चारपदरी करणे (चेनज: ३४८.३० ते ३५५.१८ बेळगाव तालुका) आणि सुमारे ६० किमी लांबीच्या संकेश्वर-हुक्केरी-घटप्रभा-गोकाक-मनोळी-सौदत्ती-धारवाड चारपदरी रस्त्याची सुधारणा आणि श्रेणीवाढ करण्यासंदर्भात असा एकूण सुमारे १७७५ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास प्रस्तावित रस्त्यांवरील वाहतूक कोंडीसह अपघातांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी नमूद केले.
या विषयावर सहानुभूतीपूर्वक विचार करून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रस्तावित रस्त्यांच्या श्रेणीवाढीबाबत लवकरच आवश्यक मंजुरी देण्याची माहिती दिली असल्याचे बेळगावचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.




