Saturday, December 6, 2025

/

‘त्या’ तिघांच्या आत्महत्येप्रकरणी चौघांना अटक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावातील जोशी मळा, खासबाग परिसरात 09 जुलै 2025 रोजी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली, तर एक महिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी तातडीने तपास करत चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या घटनेमागे आर्थिक व्यवहार आणि सोन्याचा वाद असल्याचे समोर आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खासबाग जोशी मळा येथील संतोष गणपती कुराडेकर (वय 47), सुवर्णा गणपती कुराडेकर (वय 52) आणि मंगला गणपती कुराडेकर (वय 80) यांनी पोटॅश मिसळलेले पाणी पिऊन जीवन संपवले.

याच प्रकरणात फिर्यादी सुनंदा गणपती कुराडेकर या गंभीर अवस्थेत बिम्स जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सुनंदा कुराडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 belgaum

या प्रकरणाचा तपास बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे (आयपीएस), उप-पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) रोहन जगदीश (आयपीएस) आणि उप-पोलीस आयुक्त (गुन्हे व वाहतूक) निरंजन राजे अरस (केएसपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त (मार्केट उपविभाग) संतोष डी. सत्यनाईक यांच्या नेतृत्वाखालील शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी यांच्या पथकाने केला.

तपासादरम्यान, सोन्याचे दागिने बनविणारा मुख्य आरोपी राजेश अच्युत कुडतरकर (वय 52, रा. केशव नगर, वडगाव, बेळगाव) याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष डी. सत्यनाईक, दोन पंच आणि एक सोनार यांच्या उपस्थितीत त्याच्या वडगाव येथील केशव नगरमधील घराची झडती घेण्यात आली.

या झडतीत आरोपीच्या घरातून बेकायदेशीररित्या साठवलेली 7,70,000 रुपये रोख रक्कम आणि सुमारे 49 लाख रुपये किमतीचे 661 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 56 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

या प्रकरणी राजेश अच्युत कुडतरकर (वय 52, रा. केशव नगर, वडगाव, बेळगाव), भास्कर उर्फ कृष्णा नारायण सोनार (वय 47, रा. चर्च कॉलनी, 2री क्रॉस, खासबाग, बेळगाव), नानासो हनमंत शिंदे (वय 35, रा. बिच्चू गल्ली, शहापूर) आणि रीना राजेश कुडतरकर (वय 40, रा. केशव नगर, वडगाव, बेळगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

या तपास पथकात सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष डी. सत्यनाईक आणि पोलीस निरीक्षक सिद्धप्पा एस. सिमानी यांच्यासोबत पीएसआय (कायदा आणि सुव्यवस्था) मणिकांत पुजारी, श्रीमती एस.एन. बसवा, एएसआय बी.ए. चौगला आणि सीएच नागराज एन. ओसाप्पागोळ, एस.एम. गुडगोळ तसेच कर्मचारी संदीप बागडी, श्रीशैल गोकावी, श्रीधर तलवार, अजित शिपूरे आणि कु. आर. राजश्री यांचा समावेश होता. या तपास पथकाच्या कार्यक्षमतेचे बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, संतोष कुराडेकर, सुवर्णा कुराडेकर आणि मंगला कुराडेकर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याच्या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी सापडलेल्या ‘डेथ नोट’च्या आधारे राजेश कुडतरकर, भास्कर सोनारकर, रीना राजेश कुडतरकर आणि नानासो शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी कर्ज घेताना अधिकृत आणि नोंदणीकृत संस्थांकडूनच घ्यावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.