बेळगाव लाईव्ह : वडगाव येथील ग्रामदैवत श्री मंगाई यात्रेनिमित्त मंदिर आवारात पशुबळी देण्यावर कायदेशीर बंदी आहे त्यामुळे यात्रोत्सव दरम्यान मंदिर आवारात परिसरात कोणत्याही प्रकारचे पशु बळी देण्याचे प्रयत्न करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा शहापूर पोलिसांनी दिला आहे.
येत्या मंगळवारी होणाऱ्या श्री मंगाई देवी यात्रेनिमित्त शहापूर पोलीस स्थानकात रविवारी सायंकाळी पोलीस अधिकारी, श्री मंगाई देवस्थान कमिटी वडगाव ग्रामस्थ आणि पंचमंडळींची यात्रा नियोजना संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शहापूर पोलीस निरीक्षक सीमाने यांनी यात्रे संदर्भात करण्यात येणारा पोलीस बंदोबस्त गर्दीवर होणारे नियंत्रण आणि मंदिर कमिटीने पार पाडण्याची भूमिका याबाबत सविस्तर माहिती सांगितली.
यात्रेदरम्यान मंगळवारपासून शुक्रवार पर्यंत होणारी यात्रेतील गर्दीच्या वेळी भाविकांनी विशेषता महिलांनी गर्दीच्या वेळी आपल्या गळ्यातील दागिने सांभाळावेत चोरट्यांपासून सतर्कता बाळगावी. भाविकांनी मंदिर परिसरात एकाच ठिकाणी जास्त गर्दी करू नये याशिवाय लहान मुलांची काळजी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन केले.
कर्नाटक राज्य प्राणी बळी कायदा 1959 आणि नियम 1963 अन्वये कोणत्याही देवाच्या परिसरात देवाच्या नावाने प्राणी किंवा पशुबळी देणे गुन्हा आहे यासाठी मंदिर परिसरात पशु किंवा प्राणी बळी दिला जाणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आवाहन पोलिसांनी केले.
यात्रेदरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे तरी देखील भाविकांनी मोबाईल चोरापासून सावध राहावे आणि यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी मदत करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले. बैठकीला अरुण चव्हाण पाटील, युवराज चव्हाण पाटील यांच्यासह वडगाव ग्रामस्थ आणि श्री मंगाई देवी मंदिर कमिटीचे सदस्य चव्हाण पाटील बंधू आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


