बेळगाव लाईव्ह : कर्नाटक युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाच्या ज्यूडो प्रशिक्षक रोहिणी पाटील यांची तैपेई, तैवान येथे १३ ते १७ जुलै २०२५ दरम्यान होणाऱ्या आगामी आशियाई ज्यूडो कप २०२५ साठी भारतीय ज्युनिअर महिला ज्युडो संघाच्या प्रशिक्षकपदी अधिकृतपणे निवड झाली आहे. भारतीय ज्यूडो महासंघाने भारतीय क्रीडा प्राधिकरणासोबत मिळून ही महत्त्वाची नियुक्ती केली आहे.
रोहिणी पाटील २०२४ पासून भारतीय ज्यूडो संघासाठी सातत्याने योगदान देत आहेत. यापूर्वी त्यांनी २०२४ मध्ये अकटाऊ, कझाकस्तान येथे झालेल्या सिनियर आशियाई ज्यूडो ओपन चॅम्पियनशिप आणि हॉंगकॉंग, चीन येथे झालेल्या सिनियर आशियाई ज्यूडो ओपन चॅम्पियनशिपसाठी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. आता त्या २०२५ च्या ज्युनिअर आशियाई ज्यूडो कपसाठी तैपेई, तैवान येथे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

सध्या, त्या बेळगाव येथील डिवाईएस इनडोर हॉलमध्ये १०० हून अधिक युवा ज्यूडोपटूंना प्रशिक्षण देत आहेत.
उपसंचालक श्रीनिवास बी. यांच्या पाठिंब्याने त्या आगामी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करत आहेत.


