बेळगाव लाईव्ह : खासबागमधील जोशीमळा परिसरात चिटफंड व्यवहारातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे एकाच कुटुंबातील चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, एका महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.
चिटफंड व्यवहारात अडकून अनेक लोकांचा पैशाचा तगादा, त्यातून वाढलेला ताण, आणि शेवटी मानसिक छळ… या सर्वांचे दडपण संतोष कुराडेकर यांच्या कुटुंबावर इतके वाढले की अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल या कुटुंबाला उचलावं लागलं. बेळगावातील खासबाग येथील जोशीमळा परिसरात बुधवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
सकाळी नऊच्या सुमारास संतोष कुराडेकर (वय ४७), सुवर्णा कुराडेकर (४७), मंगला कुराडेकर (८५) आणि सुनंदा कुराडेकर (५०) या चौघांनी विष प्राशन केल्याचे समजले. यात संतोष, सुवर्णा आणि मंगला यांचा मृत्यू झाला, तर सुनंदा कुराडेकर यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान मृत संतोष कुराडेकर यांच्याकडून एक सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागली असून, या चिठ्ठीमुळे आत्महत्येमागचं कारण स्पष्ट झालं आहे.

सुसाइड नोटनुसार, संतोष कुराडेकर गेली २५ वर्षे जोशीमळा परिसरात वास्तव्यास होते. ते अनेक लोकांशी चिटफंड व्यवहारात गुंतले होते. त्यांनी अनेकांकडून पैसे घेतले होते, मात्र वेळेवर परतफेड शक्य झाली नव्हती. विशेषतः त्यांनी वडगावच्या सोनार राजू कुडतरकर यांच्याकडे ५०० ग्रॅम सोने दिले होते. मात्र हे सोने परत मिळाले नाही, यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या.
या प्रकरणात अधिक गंभीर बाब म्हणजे संतोष कुराडेकर गाव सोडून पळून गेले असल्याची अफवा गावात पसरवली जात होती. यामुळे अनेकांनी त्यांच्या घरात येऊन त्रास देणे सुरू केले. अशा मानसिक त्रासाला कंटाळूनच आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा उल्लेख त्यांनी चिठ्ठीत केला आहे. राजू कुडतरकरकडून सोनं वसूल करून संबंधित लोकांना परत द्यावं असाही मजकूर चिठ्ठीत नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून सुनंदा कुराडेकर यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनीही घटनास्थळी भेट देत चौकशी सुरू केल्याची माहिती दिली आहे.शहापूर निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत


