बेळगाव लाईव्ह :अंमली पदार्थांविरोधातील आपली मोहीम तीव्र करणाऱ्या बेळगाव पोलिसांनी काल मंगळवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघा जणांना अटक करून त्यांच्याकडील 16.14 ग्रॅम हेरॉईन, 1074 ग्रॅम गांजा, रोख 1320 रुपये, एक आयफोन आणि एक दुचाकी वाहन असा एकूण 1 लाख 38 हजार 320 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे कार्तिक सिद्धप्पा मल्लाडद (वय 25, रा. शिवाजीनगर, बेळगाव) आणि मलिकसाब उर्फ मलिकजान मकबुलसाब सनदी (वय 26, रा. हिरेहट्टीहोळी, ता. खानापूर जि. बेळगाव) अशी आहेत. यापैकी कार्तिक हा काल शिवबसवनगर येथील पीडब्ल्यूडी क्वार्टर्स जवळ सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री करत होता.
याची माहिती मिळताच बेळगाव शहर सीसीबी पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकून कार्तिक याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या जवळील सुमारे 30 हजार रुपये किमतीचे 16.14 ग्रॅम हेरॉईन, रोख 520 रुपये व एक आयफोन असा एकूण 90 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसऱ्या घटनेत आरोपी मलिकसाब हा अलारवाड ब्रिज जवळ गांजाची विक्री करण्यासाठी जात होता. त्याबाबतची माहिती मिळताच माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून मलिकसाब याला अटक केली.
तसेच त्याच्याकडील 22 हजार रुपये किमतीचा 1,074 ग्रॅम गांजा, रोख 800 रुपये आणि एक दुचाकी वाहन असा 47 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला उपरोक्त दोन्ही प्रकरणी माळ मारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे




