बेळगाव लाईव्ह :सेवानिवृत्त झालेल्या केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिले जाणारे डीए, एचआर वगैरे सुधारित भत्ते यापुढे न देण्याचा निर्णय अन्यायकारक असून तो तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेने एका निवेदनाद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.
कर्नाटक राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून पंतप्रधानांच्या नावे असलेले उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन 25 मार्च 2025 च्या अर्थसंकल्पात गेल्या 1 एप्रिल 2025 च्या अगोदर सेवानिवृत्त झालेल्या केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिले जाणारे डीए, एचआर वगैरे सुधारित भत्ते यापुढे दिले जाणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.
मात्र हा निर्णय जीवनातील 40 -40 वर्षे देशाची किंवा राज्याची सेवा करण्यात व्यतीत केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर आर्थिक स्वरूपाचा अन्याय करणारा आहे. सेवानिवृत्ती वेतन (पेन्शन) ही एक सामाजिक कल्याणकारी उपाययोजना आहे, जी अशा लोकांना सामाजिक-आर्थिक न्याय देते जे त्यांच्या आयुष्याच्या कठीण काळात आहेत आणि ज्यांनी त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही या आश्वासनावर मालकासाठी सतत कष्ट केले. पेन्शन योजनेचे उद्दिष्ट म्हणजे पेन्शनधारकांना गरजेपासून मुक्त राहता येईल, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान आणि निवृत्तीपूर्व स्तरावर समान दर्जाचे जीवन जगता येईल. तरी आम्ही नम्रपणे विनंती करतो की संबंधित अधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकरणाचा पुनर्विचार करण्याचे निर्देश द्यावेत, जेणेकरून प्रभावित निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीच्या (पेन्शनरी) फायद्यांपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी कर्नाटक राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष हिरेमठ, बेळगाव जिल्हा सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस. बी. सिदनाळ, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे राज्याध्यक्ष ए. वाय. भेंडीगेरी, एम. एस. मुदकवी, श्रीमती रजपूत, श्रीमती बेन्नी आदीसह बेळगाव जिल्हा सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सदस्य स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.


