बेळगाव लाईव्ह : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्यांपासून ते निकृष्ट दर्जाच्या आहारापर्यंत विविध मुद्द्यांवर आवाज उठवत कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला.
आज अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी फेडरेशनच्या आवाहनानुसार आणि विविध संघटनांच्या संयुक्त कृतीने पुकारलेल्या अखिल भारतीय संपाचा भाग म्हणून, बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.
या निदर्शनामध्ये कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्या मांडल्या. चार नव्या कामगार कायदे रद्द करून पूर्वीचे श्रमिक हिताचे कायदे पुन्हा लागू करावेत, सेविकांचे निवृत्ती वय ६५ वर्षांपर्यंत वाढवावे, पूरक पोषण आहाराचा दर्जा सुधारावा आणि प्रति युनिट खर्च वाढवावा, या प्रमुख मागण्यांसह अनेक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांमध्ये सेवेला नागरी सेवेसारखी मान्यता देऊन ‘क’ आणि ‘ड’ गटात समाविष्ट करावे, सर्व सेविकांना ग्रॅच्युइटीचा लाभ द्यावा, आहाराचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून दर्जा वाढवावा, फेस कॅप्चर प्रणालीत येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, मातृवंदना योजनेत सुरु असलेली सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पाऊले उचलावीत अशा अनेक मागण्यांचा समावेश होता. या सर्व मागण्यांसंदर्भात एक सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला सादर करण्यात आले आहे.
या आंदोलनात माजी महापौर आणि कामगार नेते नागेश सातेरी, वाय. बी. शीगीहळ्ळी, मीनाक्षी कोठगी, गीता भोसले, सविता डिग्रे, मंगल पाटील, चिन्नाक्का होळीकवी आदींसह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते.


