बेळगाव :रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवण्याचा प्रकार बेळगाव शहरातील आजम नगर परिसरात घडला आहे. पद्मजा कुलकर्णी (वय 75) असे या घटनेत जखमी होऊन सोनसाखळी चोरी गेलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार पद्मजा या केली इस्पितळाच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावरून चालत जात होत्या त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यानी पद्मजा कुलकर्णी यांच्या गळ्यातील 35 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला.
चोरट्यांनी साखळी हिसकावताना वृद्ध महिला जमिनीवर पडल्या, यामुळे त्यांच्या मान, कोपर आणि पायाला जखमा झाल्या. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
दिवसाढवळ्या आझमनगर परिसरात वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार लांबवल्याने पोलिसांना आता गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. एपीएमसी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.
या घटनेनंतर रस्त्यावरून चालत जाताना महिलांनी आणि वृद्धांनी आता काळजी घेणे गरजेचे बनले आहे


