बेळगाव लाईव्ह : वाहतूक नियम भंगाचे प्रकार रोखून बेळगाव शहरातील रहदारी चलनवलन सुधारण्यासाठी आजपासून स्मार्ट सिटीच्या रहदारी व्यवस्थापन केंद्राचे सीसीटीव्ही कॅमेरे, बॉडी वन कॅमेरा आणि रहदारी पोलिसांकडील मोबाईल फोन कार्यान्वित झाले आहेत. बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी माहिती दिली.
बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देताना सांगितले की, बेळगाव शहरातील रहदारी चलनवलन सुधारण्यासाठी शुक्रवारी 11 जुलै पासून कांही पावले उचलत आहोत.
त्यानुसार उद्यापासून आतापर्यंत जो रहदारी पोलीस कर्मचारी वर्ग वाहने थांबून चालक परवाना व इतर कागदपत्रे तपासणे, हेल्मेट सक्ती, कार सीटबेल्ट सक्ती, दंड आकारणी वगैरेंची अंमलबजावणी करत होता. ही अंमलबजावणी आम्ही आता 90 टक्के कमी करणार आहोत. त्या ऐवजी उद्यापासून स्मार्ट सिटीच्या रहदारी व्यवस्थापन केंद्राचे सीसीटीव्ही कॅमेरे, बॉडी वन कॅमेरा आणि रहदारी पोलिसांकडील मोबाईल फोन यांच्या माध्यमातून रहदारी नियम भंगाचे प्रकार पकडले जातील. त्याचप्रमाणे नियम भंग करणाऱ्या वाहनांच्या मालकांना त्यांच्या व्हाट्सअप किंवा एसएमएसद्वारे थेट चलन धाडले जाईल. हे केल्यामुळे मनुष्यबळाचा वापर कमी होणार असून ते मनुष्यबळ शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वापरले जाईल.

दुसरी गोष्ट म्हणजे शहरातील कांही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. संबंधित रस्ते आणि खड्ड्यांची यादी करून ती यादी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते आणि महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सुपूर्द केली जाईल. जेणेकरून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले जाऊन बेळगाव शहरातील वाहतुकीचा वेग वाढेल. तेव्हा समस्त शहरवासीयांना विनंती आहे की त्यांनी या कामी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. तुम्ही जर मोटरसायकल वरून प्रवास करत असाल तर कृपया हेल्मेट घाला कारने प्रवास करत असाल तर सीट बेल्ट लावा. त्याचप्रमाणे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यांवरील पादचाऱ्यांची काळजी घ्या.
रस्त्यावरून वाहने जपून हाका, कारण वेगाने वाहने हाकल्यामुळे रस्त्यावरील गढूळ पाणी उडून त्याचा त्रास पादचाऱ्यांना होऊ शकतो. तसेच अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही असे सांगून सर्व सूचनांचे पालन करून शहरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.


