बेळगाव लाईव्ह :हेस्कॉमच्या बेपर्वा, गलथान कारभारामुळे अनेकांना नाहक त्रास, तर काहींना आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ आली असून गोजगा येथे नुकताच एका म्हशीला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त होण्याबरोबरच ताबडतोब नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागले आहे.
बेळगाव तालुक्यातील गोजगा या गावाजवळ गेल्या रविवारी दाजीबा कल्लाप्पा शहापूरकर यांच्या मालकीची म्हैस विद्युत तारेचा स्पर्शाने दगावली आहे. खांबावरून तुटून पडलेल्या संबंधित धोकादायक विजेच्या तारेसंदर्भात हेस्कॉमच्या संबंधित अधिकाऱ्यांना परिसरातील शेतकऱ्यांनी सुचित केले होते. मागील काही दिवसांपासून ही विद्युत भारित तार तशीच जमिनीवर पडून होती.
मात्र त्याबाबत वारंवार माहिती देऊनही हेस्कॉम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे रविवारी दाजीबा शहापूरकर यांनी चरायला सोडलेली म्हैस त्या विद्युत भारीत तारेचा स्पर्श होऊन मृत्युमुखी पडली.
या दुर्घटनेमुळे शहापूरकर यांचे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वारंवार सूचना करून देखील हेस्कॉमच्या दुर्लक्षपणामुळे लाख मोलाची म्हैस दगावल्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे तसेच दाजीबा शहापूरकर यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी आणि संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.




