बेळगाव लाईव्ह : बेळगाव मध्यवर्तीय बस आवारामध्ये गांजाच्या नशेत वावरणाऱ्या एका युवकाला काल मार्केट पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव मुजाहिदअहमद वाहिदअहमद नाईकवाडी (वय 28, रा. न्यू गांधीनगर, बेळगाव) असे आहे. मुजाहिद हा काल मंगळवारी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक (सीबीटी) आवारामध्ये संशयास्पद अवस्थेत वावरत असताना मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवन्नवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शी मुजाहिदने गांजा या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला जागीच अटक केले. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सांबरा (ता. जि. बेळगाव) येथे मटका जुगारसाठी पैसे घेणाऱ्या एका युवकाला मारीहाळ पोलिसांनी अटक केली असून त्याच्या जवळील 4,500 रुपये आणि मटक्याचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव विलास राजू बेळगावकर (वय 25, रा. जय भवानीनगर, कलखांब ता. जि. बेळगाव) असे आहे. काल मंगळवारी सांबरा गावातील गवळी गार्डन शेजारी सार्वजनिक ठिकाणी विलास मटका जुगारासाठी पैसे घेत होता. याबाबतची माहिती मिळताच मारीहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून विलास याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या जवळील रोख 4,500 रुपये आणि मटक्याचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी विलास याला अटक करण्याबरोबरच महेश कल्लाप्पा यल्लारी आणि किरण सिद्राई पिटगी या मटका खेळणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.


