बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे वडगाव येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री मंगाई देवी यात्रोत्सवाला भक्तीभावाने प्रारंभ झाला असताना आज पहिल्या दिवशी यात्रेच्या ठिकाणी विश्व प्राणी कल्याण मंडळाच्या पशु प्राणी बळी निर्मूलन जागृती महासंघातर्फे प.पू. श्री दयानंद स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली प्राणी हत्त्येच्या विरोधात जनजागृती करण्यात आली.
वडगाव येथील जागृत देवस्थान श्री मंगाई देवीच्या यात्रेनिमित्त बकरी व कोंबड्याचा बळी देण्याची परंपरा आहे. ही जरी धार्मिक परंपरा असली तरी प्राण्यांची हत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे गेल्या कांही वर्षांपासून विश्व प्राणी कल्याण मंडळाच्या पशु प्राणी बळी निर्मूलन जागृती महासंघातर्फे यात्रेच्या निमित्ताने बकरी, कोंबड्या, रेडा वगैरे मुक्या प्राण्यांचा बळी दिला जाऊ नये यासाठी चळवळ सुरू करण्यात आली आहे.
या चळवळीच्या माध्यमातून देवाच्या नावे मुक्या प्राण्यांचा बळी देणे किती गैर, अमानवी आहे, अंधश्रद्धा आहे हे पटवून देऊन यात्रेप्रसंगी दिले जाणारे प्राण्यांचे बळी रोखण्याचे काम केले जात आहे. या पद्धतीने पशु प्राणी बळी निर्मूलन जागृती महासंघाने यापूर्वी विविध ठिकाणच्या यात्रा पशुबळीमुक्त करण्यात यशही मिळवले असून त्यामध्ये बेळगाव शहराजवळील उचगाव श्री मळेकरणी यात्रेचाही समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर विश्व प्राणी कल्याण मंडळाच्या पशु प्राणी बळी निर्मूलन जागृती महासंघातर्फे आज मंगळवारी सकाळी वडगाव येथील श्री मंगाई देवी यात्रेच्या पहिल्या दिवशी देवीच्या मंदिरासमोर प्राणी हत्त्येच्या विरोधात जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी बोलताना बेंगलोरच्या बसवधर्म ज्ञानपीठाचे प.पू. श्री दयानंद स्वामीजी यांनी श्री मंगाई देवी यात्रेत प्राणी व पक्ष्यांचे बळी देऊ नये अहिंसात्मक पद्धतीने देवीची मनोभावे पूजा करावी असे आवाहन केले.
ते म्हणाले की, श्री मंगाई देवी माता ही कायम लोककल्याणाचा आशीर्वाद देत असते. आज यात्रेनिमित्त तिच्या सानिध्यात येऊन आपण सर्वजण आपले जीवन धन्य करत आहोत. मात्र हे होत असताना काही भक्त अंधश्रद्धेपोटी देवीच्या नावावर प्राण्यांचा बळी देणे आणि कोंबड्यांची छोटी छोटी चिमुकली पिल्ले देवीच्या मंदिरावर निष्ठूरपणे उडवण्याची कृती करत होते. मात्र कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पोलीस कर्मचारी आणि यात्रा कमिटीचे पदाधिकारी व सदस्य यांच्या समन्वयातून आज श्री मंगाई देवी मंदिरावर कोंबडीची पिल्ले उडवण्याच्या निष्ठूर प्रकाराला आळा घालण्यात यश आले आहे. आपण पाहू शकता देवीचे मंदिर किंवा परिसरात तसा कोणताही गैरप्रकार होताना दिसत नाही, याबद्दल मी समस्त भाविकांचा आभारी आहे. भक्तांनी लक्षात घ्यावे की त्यांना देवीचा आशीर्वाद खरोखर मिळवावयाचा असेल त्यांनी दयेची भावना ठेवली पाहिजे. दयेशिवाय कोणताही धर्म नाही.
मुकप्राण्यांबद्दल तुम्ही दया, प्रेम दाखवाल तर आपोआप देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळून ती तुमचे कल्याण करेल. मनुष्य प्राणी फक्त देवीला प्रिय नाही तर पृथ्वीतलावरील सर्व पशुपक्षी, जीवजंतू तिला तिच्या अपत्या सारखी असतात. त्यामुळे कोणतीही मातेला आपल्या आपत्त्यांचा आपल्यासमोर बळी दिलेला, त्यांचे रक्त सांडलेले आवडणार नाही. यंदाच्या श्री मंगाई देवी यात्रेमध्ये देखील प्राण्यांचा बळी रोखण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत आणि त्याला वडगाववासीय सहकार्य करत आहेत ही अत्यंत समाधानाची बाब असून मी त्यासाठी सर्वांचे धन्यवाद मानतो असे सांगून प्राणी हत्येवर स्वयंस्फूर्तीने बंदी घालण्यात आलेल्या उचगाव येथील श्री मळेकरणी यात्रेचे उदाहरण त्यांनी दिले. उचगाव येथील भाविकांचा आदर्श घेऊन जर इतर यात्रेच्या ठिकाणी स्वयंपूर्ण प्राणी हत्तीवर बंदी घालण्यात आली तर लाखो पशुपक्ष्यांचे हत्याकांड बंद होईल, असे मत प.पू. श्री दयानंद स्वामीजी शेवटी व्यक्त केले
उचगाव ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा बाळकृष्ण तेरसे यांनी यावेळी बोलताना आमच्या गावच्या श्री मळेकरणी यात्रेतील प्राणी हत्त्येची जवळपास 105 वर्षांची परंपरा आम्ही सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने बंद केली आहे, अशी माहिती दिली. तसेच आता श्री मंगाई देवी यात्रेतील प्राणी हत्या बंद करण्यासाठी आपण स्वामीजींना साथ देत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी श्री मंगल देवी यात्रा कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी, उचगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, प्रमुख नागरिक, वडगाव येथील प्रमुख नागरिक उपस्थित होते.


