बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील राकसकोप-तुडये धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळील मळवी येथील एका शेतकऱ्याला तब्बल २८ किलो वजनाचा कटला मासा मिळाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. ऐन पावसाळ्यात राकसकोप आणि तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करणाऱ्यांसाठी हा एक दुर्मिळ योग ठरला आहे.
या पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मासे येत असले तरी, इतक्या मोठ्या वजनाचा मासा मिळणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. चुकूनच असा मोठा मासा जाळ्यात सापडतो, त्यामुळे हा एक विशेष प्रसंग ठरला आहे.

या भागामध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. कटला आणि नवरंग माशाला तर नेहमीच मोठी मागणी असते. सीमाभागातील अनेक लोक मासेमारीसाठी तुडये आणि हाजगोळी या ठिकाणी येतात.यादरम्यान शेतकऱ्याला तब्बल २८ किलोचा कटला प्रजातीचा मासा मिळाला असून या माशाचा आस्वाद तुडये, हाजगोळी आणि राकसकोप येथील शेतकऱ्यांनी घेतला.


