बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील मुतगे गावातील नवविवाहिता स्वाती श्रीधर सनदी हिचा बंगळूरु येथे गळफास लावून आत्महत्या केल्याचे भासवून निर्घृण खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी आणि मृत स्वातीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी मृत स्वातीच्या आई-वडिलांसह मुतगे ग्रामस्थांच्या वतीने बेळगाव शहर पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
मुतगे येथील महिलावर्गासमवेत बेळगाव पोलीस आयुक्तालयात पोहोचून डॉ. सोनाली सरनोबत यांनी आज गुरुवारी सकाळी या मागणीचे निवेदन बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांना सादर केले. निवेदना स्वीकार करत, पोलीस आयुक्त बोरसे यांनी मृत स्वाती सनदी हिला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या परीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी सांगितले की, पूर्वाश्रमीची स्वाती केदार, लग्नानंतर स्वाती सनदी ही दीड वर्ष पतीसोबत बंगळूरु येथे राहत होती. या काळात सासरकडील मंडळी तिच्या शिक्षणावरून, रूपावरून आणि ग्रामीण राहणीमानावरून तिचा सतत छळ करत होती. बेळगावला आल्यावर ती आपल्या आईला हा छळ सांगत असे. एकदा छळाला कंटाळून माहेरी परतल्यावर आई-वडिलांनी तिला सासरी पाठवण्यास नकार दिला होता. मात्र, तिचा पतीने “आता त्रास देणार नाही” असे वचन दिल्यावर तिला पुन्हा सासरी पाठवण्यात आले. परंतु, १२ जुलै रोजी नवऱ्याने स्वातीने आत्महत्या केल्याचे तिच्या आई-वडिलांना सांगितले. धडधाकट स्वातीच्या या आकस्मिक निधनाने तिच्या आई-वडिलांना धक्का बसला.

खिडकीला गळफास लावलेल्या संशयास्पद अवस्थेत तिचा मृतदेह आढळला, तसेच गळ्यावरील खुणा हत्येची शक्यता दर्शवत असल्याने, सासरच्या मंडळींनीच तिचा खून केल्याचा दाट संशय आहे, कारण यापूर्वी हुंड्यासाठीही तिचा छळ केला जात होता. स्वाती सनदीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांना कठोर शिक्षा देऊन तिला न्याय मिळावा, अशी मागणी करत त्यांनी, “आमच्या मुलींना कोणत्या विश्वासावर लग्न करून द्यावे?” असा प्रश्न उपस्थित केला. दुर्दैवाने, बंगळूरु पोलिसांनी माहेरच्या लोकांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला आणि “खून झाल्याचा पुरावा काय?” असा उद्धट सवाल केला, असे डॉ. सरनोबत यांनी नमूद केले.
“खून किंवा नैसर्गिक मृत्यूचा तपास लावणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे आणि म्हणूनच आज आम्ही बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना निवेदन सादर केले आहे. त्यांनी आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे, बंगळूरु येथील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधला आहे.
आता आम्ही देखील बंगळूरु येथील संबंधित पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवण्याची तयारी करत आहोत,” अशी माहिती देऊन डॉ. सरनोबत यांनी शेवटी सांगितले की, एकंदर कोणत्याही परिस्थितीत सोनाली सनदी हिला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.


