बेळगाव लाईव्ह :एका प्रेमी युगुलाने चक्क ऑटोरिक्षामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गोकाक तालुक्यातील हिरेनंदी गावात उघडकीस आली आहे.
आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलाची नावे राघवेंद्र नारायण जाधव (वय 28) आणि रंजिता अडिवेप्पा चोबारी (वय 26) अशी आहेत. हे दोघेही सौंदत्ती तालुक्यातील मुन्नोळी गावातील नागलिंगनगर येथील रहिवासी होते.
राघवेंद्र हा स्वतःच्या मालकीची ऑटोरिक्षा चालवून घरचा उदरनिर्वाह चालवत होता. गेल्या बऱ्याच वर्षापासून त्याचे रंजीता हिच्याशी सूत जुळले होते. प्रेम संबंधातून दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

तथापि त्यांच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता. काही दिवसांपूर्वी रंजीता हिच्या घरच्या मंडळींनी दुसऱ्या एका तरुणाशी तिचा विवाह ठरवला होता. घरच्यांचा नकार कायम असल्यामुळे सर्व गोष्टींना कंटाळून राघवेंद्र आणि रंजीता यांनी ऑटोरिक्षातून एकांत स्थळी जाऊन आत्महत्या केली. सदर प्रकार उघडकीस आला.
त्यावेळी या दोघांनी नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.




