बेळगाव लाईव्ह :चोर्ला मार्गे बेळगाव -गोवा रस्त्यावरील कुसमळी (ता. खानापूर) येथील मलप्रभा नदीवरील नव्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना काल सोमवारी सायंकाळपासून हा पूल दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तथापि पुलावरून सहाचाकी वाहनांसारख्या अवजड वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील नव्या पुलाचे काम मे महिन्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी कंत्राटदाराने घेतली होती. तथापि कांही तांत्रिक कारणामुळे काम रेंगाळून आता जून अखेरीस पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची राज्याचे महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी नुकतीच पाहणी केली.
यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व कंत्राटदाराशी चर्चा केल्यानंतर पुलावरून दुचाकी आणि चारचाकी वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र अवजड वाहतुकीवर बंदी असणार आहे.
पुलाचे भराव योग्य रीतीने घाला, संरक्षक भिंत बांधून घ्या आणि 45 दिवसानंतर पाहणी करून अवजड वाहतूक सुरू करा अशी सूचना मंत्री बैरेगौडा यांनी केली आहे. त्यामुळे काल सोमवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून कुसमळी पुलावरून केवळ दुचाकी व चारचाकी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान अवजड वाहतुकीला संपूर्ण बंदी असल्यामुळे नव्या पुलाच्या संरक्षक भिंत आणि कठड्याचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील अवजड वाहतूक खानापूर आणि बैलूर मार्गे वळवण्यात आली आहे.


