बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती, रामदुर्ग, मुडलगि, गोकाक आणि रायबाग तालुक्यांमधील विविध ग्रामपंचायत क्षेत्रांत सुरू असलेल्या जल जीवन मिशन कामांची जिल्हा परिषद सीईओ राहुल शिंदे यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी, सीईओ राहुल शिंदे यांनी सौंदत्ती तालुक्यातील तडासलूर आणि सोप्पडला ग्रामपंचायत क्षेत्रातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची तपासणी केली. तडासलूर ग्रामपंचायत हद्दीतील हलकी गावाला भेट देऊन, जल जीवन मिशन योजनेचे काम सविस्तर प्रकल्प अहवालानुसार झाले आहे की नाही, यावर त्यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष आणि सदस्यांशी चर्चा करून माहिती घेतली.
त्याचबरोबर, रामदुर्ग तालुक्यातील के. चंदरगि, गुदुगप्पा आणि हिरेकोप्पा के.एस. ग्रामपंचायत क्षेत्रातील चिकोप्पा के.एस., बागोजीकोप्पा आणि हुलकुंद ग्रामपंचायतींनाही सीईओ राहुल शिंदे यांनी भेट देऊन जल जीवन मिशन योजनेच्या कामांची पाहणी केली.
यावेळी बोलताना शिंदे यांनी, गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याचे निर्देश दिले. पाण्याच्या टाक्यांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करून, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत उर्वरित गावांची कामे तात्काळ पूर्ण करावीत आणि नागरिकांना नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, असे कठोर निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यानंतर, सीईओ राहुल शिंदे यांनी गोकाक तालुक्यातील कळीगुद्दी, कौजलगी, गोसबाळ, बिलकुंदी आणि तळकटनाळ ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांना भेट दिली. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत घरांना दिलेल्या नळ जोडण्यांबाबत त्यांनी स्थानिक लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला आणि नळांना पाणी येते की नाही याची माहिती घेतली.
तसेच, मुडलगि तालुक्यातील मसुगुप्पी, धर्मट्टी ग्रामपंचायती आणि रायबाग तालुक्यातील निपणाळ व बेंडवाड ग्रामपंचायत हद्दीतील जोडाट्टी ग्रामपंचायत क्षेत्रातील जे.जे.एम. कामांचीही त्यांनी पाहणी केली.
या प्रसंगी बेळगाव विभाग ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता किरण गोरपडे, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी आनंद बडकुंद्री, बसवराज ऐनापूर, एफ.जी. चिन्नान्नवर, सुरेश कद्दू, तालुका ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता, तालुका पंचायत राज व ग्रा.उ. सहाय्यक संचालक, तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


