बेळगाव लाईव्ह : जिल्हा पोलीस प्रशासनाकडून गुन्हे रोखणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिशय चांगले कार्य होत आहे. तक्रारदारांसाठी पोलीस ठाण्यात भयमुक्त वातावरण असण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेशी पोलिसांचे वर्तन सौजन्याचे असले पाहिजे, असे बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) चेतनसिंग राठोड यांनी स्पष्ट केले
बेळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आज शुक्रवारी सकाळी शहरातील पोलीस मैदानावर पोलिसांचा निरीक्षण परेड सोहळा शिस्तबद्धरीत्या पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने आयजीपी राठोड बोलत होते.
आपल्या भाषणात ते म्हणाले की, या वर्षाचे सात महिने होत आले आहेत या कालावधीत मी पाहतोय गेल्या जानेवारीपासून जिल्हा पोलीस प्रशासनाकडून गुन्हे रोखणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिशय चांगले कार्य होत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोकाक येथील सुरळीत पार पडलेली यात्रा आहे होय.
आगामी काळातही तुमच्याकडून अशाच उत्तम कार्याची आम्ही अपेक्षा करतो. येत्या काळात अनेक सण उत्सव साजरे होणार आहेत, श्री गणेशोत्सव सण जवळ आला आहे. हे सर्व सण उत्सव आनंदाने शांततेत सुरळीत पार पडतील याची दक्षता घेतली जावी असे सांगून तक्रार नोंदवण्यासाठी येणाऱ्यां करता पोलीस ठाण्यात भयमुक्त वातावरण असले पाहिजे. तक्रारदाराची सहानुभूतीपूर्वक चौकशी करून तक्रार नोंदवून घेण्याद्वारे तिचे तातडीने निवारण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले पाहिजेत. एकंदर सर्वसामान्य जनतेशी पोलिसांचे वर्तन सौजन्याचे असले पाहिजे, असे आयजीपी चेतनसिंग राठोड यांनी स्पष्ट केले.

पोलीस परेड मैदानावरील आजच्या पोलिसांच्या निरीक्षण परेडप्रसंगी प्रारंभी जिल्हा पोलीस दलातील विविध तुकड्यांनी वाद्यवृंदाच्या तालावर शिस्तबद्ध संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
यावेळी कर्तव्यावर असताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलिसांचा प्रमुख पाहुणे आयजीपी राठोड यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सदर सोहळ्यास मान्यवर मंडळींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतक होते.


