बेळगाव लाईव्ह : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर गरिबीवर मात करत गौंडवाड येथील नीता विनोद पवार यांनी वकिलीची पदवी मिळवत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. शेतात पॉवर ट्रेलर चालवून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या नीता यांनी शिक्षणाची कास धरत हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कर्तृत्वामुळे गौंडवाडसह संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. गौंडवाडमध्ये वकील होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे सासर महिपाळगड (ता. चंदगड) या गावातही वकील होणारी ती पहिली महिला सूनबाई ठरली आहे.
गरिबी पाचवीला पुजलेली असली तरी, काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा दृढनिश्चय मनात बाळगलेल्या गौंडवाड येथील नीता विनोद पवार यांनी आपल्या कठोर परिश्रमाने वकिलीची पदवी मिळवत समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. नीता यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर गरिबीवर मात करत हे शिक्षण घेतले. त्यांच्या या स्तुत्य आणि वाखाणण्याजोग्या कर्तृत्वामुळे गौंडवाडसह संपूर्ण परिसरात त्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
गौंडवाड गावातून वकील होणारी नीता ही पहिलीच महिला ठरली आहे. विशेष म्हणजे, तिचे सासर महिपाळगड (ता. चंदगड) या गावातही वकील होणारी ती पहिलीच महिला सूनबाई ठरली आहे, हाही एक मोठा मानच. नीता यांचे वडील शेती करतात, तर आई भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती. सध्या त्यांना रोजगार हमी योजनेत काम मिळाल्याने त्या तिकडे जात आहेत. केवळ दहा बाय दहाच्या घरात या सर्वांचा संसार सुरू आहे. नीताला दोन बहिणी आणि एक भाऊ असून, भावंडांमध्ये ती सर्वात मोठी असल्याने साहजिकच घरची जबाबदारी तिच्यावरच पडली होती.
गौंडवाडमध्ये भाताची लावणी करूनच पीक घेतले जाते, त्यासाठी शेतात चिखल करावा लागतो. घरात मोठी असल्याने नीता स्वतः पॉवर ट्रेलर चालवून शेतात चिखल करत असे, त्यानंतर भाताची लावणी केली जात होती. याबरोबरच शेतात रताळी, गाजर, बटाटे ही पिके घेण्यासाठी वडील आणि तिची नेहमीच धडपड सुरू असायची. शेतीसोबतच पाच जनावरेही पाळली आहेत. त्या जनावरांना शेतातून चारा कापून आणणे, शेण काढणे, दूध काढणे या जबाबदाऱ्या देखील नीताच सांभाळत असे. गावातील त्यांचे लहान आणि जुने घर कोसळल्याने, हे सर्वजण सध्या शेतातच पत्र्याचे शेड उभारून राहत आहेत.

घरच्या हलाखीच्या परिस्थितीतही नीता यांनी शेतीची कामे करत गावातील महात्मा गांधी हायस्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ज्योती महाविद्यालयातून कॉमर्स बारावी आणि त्यानंतर भाऊराव काकतकर कॉलेजमधून बी.कॉमची पदवी संपादन केली. ही पदवी घेतल्यानंतर, परिस्थिती प्रतिकूल असली तरी आपल्या मुलीला वकील करायचे असे त्यांच्या आई-वडिलांनी ठरवले. आईच्या आग्रहामुळे नीता हिने बी.व्ही. बेल्लद लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि जिद्दीने अभ्यास सुरू केला.
शिक्षण घेत असतानाच तिच्यासाठी विवाहाचे स्थळ आले. त्यावेळी मला आधी माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे, असे तिने स्पष्ट सांगितले. त्यावर माहिपाळगड येथील भोगन कुटुंबीयांनी विवाहानंतरही शिक्षण पूर्ण करण्यासाठी आम्ही तुला पूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन दिले. मुलीसाठी चांगले स्थळ आल्याने आई-वडिलांनी नीताचा विवाह करण्याचे ठरवले. आई-वडिलांनी बोलल्यानंतर ती विवाह करण्यास तयार झाली. विवाह झाल्यानंतर पती अभिजीत भोगन आणि सासरच्या कुटुंबीयांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि सर्वतोपरी सहकार्य केले. “सासरच्यांच्या सहकार्यामुळेच आज मी वकील बनले आहे,” असे नीता यांनी सांगितले.
नीता पवार यांची ही कथा अनेक अडचणींवर मात करून मिळवलेल्या यशाचे प्रतीक आहे. त्यांचे जीवन हे जिद्द, चिकाटी आणि कुटुंबाच्या पाठिंब्याचे एक सुंदर उदाहरण आहे, जे अनेकांना प्रेरणा देऊ शकते. नीता पवार यांनी मिळविलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


