बेळगाव लाईव्ह : बेळगावात फुटबॉल स्पर्धेचा फिव्हर वाढत असून, सेंट पॉल हायस्कूलच्या मैदानावर १६ जुलै २०२५ रोजी पॉलाईट कप अंडर-१४ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला मोठ्या उत्साहात आणि खेळाडूवृत्तीने सुरुवात होणार आहे.
पॉलाईट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाईड आणि सेंट पॉल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव शहर आणि परिसरातील उदयोन्मुख फुटबॉलपटूंना एकत्र आणण्याचा यामागे उद्देश आहे.
तळागाळातील फुटबॉलला प्रोत्साहन देणे आणि युवा क्रीडा प्रतिभेला वाव देणे हे पॉलाईट कपचे मुख्य ध्येय आहे. या स्पर्धेत बेळगाव आणि आसपासच्या २४ हून अधिक नामांकित शाळांतील संघ सहभागी होणार आहेत. पुढील सात दिवस हे सामने अत्यंत चुरशीने खेळले जातील, जिथे युवा फुटबॉलपटू त्यांचे कौशल्य, सांघिक कार्य आणि खेळाबद्दलची त्यांची आवड दाखवतील. शाळा, PBW सदस्य, प्रशिक्षक, पालक आणि उत्साही विद्यार्थी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होईल.
पॉलाईट कप केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून, शिस्त, मैत्री आणि फेअर प्लेचा उत्सव आहे, जी पॉलाईट परंपरेची मूळ मूल्ये आहेत. विजेते, उपविजेते आणि विविध श्रेणींतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ट्रॉफी, पदके आणि प्रमाणपत्रे दिली जातील.
यामध्ये ‘सर्वोत्कृष्ट गोलकीपर’ आणि ‘सर्वाधिक आशादायक प्रतिभा’ यांचाही समावेश असेल, तसेच ‘सर्वोत्कृष्ट खेळाडूला’ सायकल बक्षिसादाखल दिली जाईल. या स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमी, युवा खेळाडूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

