बेळगाव लाईव्ह :हेस्कॉम कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या गलथानपणाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत असून आपले धनादेशाच्या स्वरूपात भरलेले विजेचे बिल दुसऱ्याच्या खात्यात जमा होत असल्याने त्यांना मनस्तापासह भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी त्रस्त वीज ग्राहकांकडून होत आहे.
अलिकडे हेस्कॉमचा कारभार म्हणजे धन्यास कण्या, चोरास मलिदा असाच झालाय. विजेचे बिल भरणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांपैकी अनेक जण ते बिल धनादेशाच्या स्वरूपात भरतात. मात्र यापैकी काहींचे बिलाचे पैसे हेस्कॉम कर्मचाऱ्यांचा गलथानपणामुळे दुसऱ्याच्याच खात्यात जमा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
विजेचे बिल दुसऱ्याच्या खात्यात जमा झाल्यामुळे बील वसुलीसाठी हेस्कॉम कर्मचारी पुन्हा ग्राहकांच्या दारात उभे ठाकत आहेत. बील रितसर भरुनही हा वसुलीचा त्रास कशासाठी म्हणून संबंधित ग्राहक थेट हेस्कॉम कार्यालय गाठतात, तेंव्हा तिथे आपल्या आयडी नंबरवर बील जमा करायच सोडून दुसऱ्याच नंबरवर जमा झाल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यानंतर त्रस्त संतप्त ग्राहकाने आपल्याकडील सर्व पुरावे दाखवून आवाज उठवताच संबधीत कर्मचाऱ्याकडून आपोआप बिलाचे पैसे त्या ग्राहकाच्या खात्यावर जमा केले जात आहेत.
तथापि दरम्यान संबधीत हेस्कॉम कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे बिचाऱ्या ग्राहकाला मात्र मनस्ताप सहन करावा लागण्याबरोबरच हेस्कॉम कार्यालयाला ये-जा करण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या महागाईने जनतेची पोटं भरण जिकेरिचे झाले आहे. त्यात हेस्कॉम कर्मचाऱ्यांच्या या गलथान कारभारामुळे त्रास मनस्ताप सहन करावा लागत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तरी हेस्कॉमच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या गलथान कारभाराची गांभीर्याने दखल घेऊन जनतेला भू्र्दंड न घालता लक्षपूर्वक कामं करण्याची चांगली समज संबंधित कर्मचाऱ्यांना द्यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
दरम्यान सरकारने पाच गॅरंटीमधये मोफत वीज देण्याच जाहिर केल असले तरी आता परत बील येऊ लागल्याने गॅरंटी फक्त सत्तेवर येण्यापूरतीच होती का? असा प्रश्न ग्राहक करू लागले आहेत. कारण आता वीज मीटर डिपॉझिट भरा म्हणून नोटिसा येऊ लागल्या आहेत. या पद्धतीने एकिकडे देण्याचे उदारपणाचे नाटक करायच आणि दुसऱ्या बाजूने पैसे वसूल करुन जनतेची लूट करायची? जनतेचा कोणी वाली आहे कि नाही? असा संतप्त सवाल देखील उपस्थित केला जात आहे.


