बेळगाव लाईव्ह :बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) येथे वेगवेगळ्या दोन ठिकाणी मटका जुगाराचे आकडे घेणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी काल शुक्रवारी गजाआड केले असून त्यांच्याकडील रोख 1,940 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे संतोष आप्पाजी मोरे (वय 40, रा. आंबेडकर गल्ली उचगाव, बेळगाव), संतोष गावडे बागीलगेकर (वय 60, रा. कलमेश्वर गल्ली, बेळगाव) आणि राजेसाहेब अविनसाब किल्लेदार (वय 58, रा. मारीहाळ, बेळगाव) अशी आहेत. या तिघांपैकी संतोष मोरे हा बेळगुंदी गावातील जय भवानी टी स्टॉल समोरील काजूच्या बागेत मटका जुगाराचे आकडे घेत होता. त्यावेळी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्वेता व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून संतोषला ताब्यात घेण्याबरोबरच त्याच्याकडील रोख 840 रुपये आणि मटक्याचे साहित्य जप्त केले.
त्याचप्रमाणे बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एल. एस. ज्योडट्टी आणि सहकाऱ्यांनी बेळगुंदी गावाजवळील बिजगर्णी रस्त्यावरील काजूच्या बागेतील रिकाम्या जागेत मटका जुगाराचे आकडे घेणाऱ्या सुभाष बागिलगेकर आणि राजेसाहेब किल्लेदार यांना रंगेहाथ पकडून त्यांच्या जवळील रोख 1100 रुपये, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. सदर दोन्ही प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
उद्यमबाग येथे गांजा विक्री करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात
उद्यमबाग येथील जैन इंजिनिअरिंग कॉलेज शेजारील रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी गांजाची विक्री करणाऱ्या दोघा जणांना उद्यमबाग पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील 32,000 रुपये किमतीचा 1068 ग्रॅम वजनाचा गांजा, रोख 700 रुपये आणि 15000 रुपयांचा मोबाईल जप्त केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे राघवेंद्र योगेश नायक (वय 32, रा. पाटील गल्ली, पिरनवाडी बेळगाव) आणि दीपक यशवंत पाटील (वय 28, रा. रघुनाथ पेठ, अनगोळ बेळगाव) अशी आहेत.
मिळालेल्या माहिती वरून उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकांनी आपल्या सहकाऱ्यांसह धाड टाकून उपरोक्त कारवाई केली. या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.


