बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सव आगमन सोहळा आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील कमी उंचीचे विद्युत खांब बदलून त्या ठिकाणी जास्त उंचीचे खांब उभारण्याची मागणी श्री लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाने हेस्कॉमकडे केली आहे. शुक्रवारी, ११ जुलै रोजी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांना यासंदर्भात निवेदन दिले.
गणेश मूर्तींची उंची जास्त असल्यामुळे गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान विद्युत तारांचा अडथळा निर्माण होतो. मागील वर्षी श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या मागणीनुसार, काही ठिकाणी जास्त उंचीचे विद्युत खांब उभारण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित भाग आणि इतर ठिकाणी अजूनही विद्युत खांब बदललेले नाहीत. यामुळे मिरवणुकीला अडथळा येत असून, गणेशोत्सवापूर्वी हे खांब बदलून त्या जागी जास्त उंचीचे खांब बसवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांनी निवेदन स्वीकारले. त्यांनी बेळगाव शहर आणि उपनगरातील मिरवणूक मार्गांबद्दल महामंडळाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. तसेच, गणेशोत्सवापूर्वी मिरवणूक मार्गावरील विद्युत खांब बदलण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

महामंडळाचे नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी मिरवणुकीच्या मार्गावर असलेल्या कमी उंचीच्या विद्युत खांबांमुळे मोठ्या मूर्ती किंवा देखावे नेताना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे, उंच खांब बसवण्याची मागणी त्यांनी केली. मिरवणुकीच्या मार्गावर तात्पुरत्या वीज जोडणीची मागणी आणि इतर आवश्यक सोयींसाठी महामंडळ कटिबद्ध असल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी गणेशोत्सव काळात तात्पुरत्या वीज जोडणीसाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी महामंडळाच्या निवेदनाची अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी असे म्हटले.
यावेळी लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक व मनपा माजी गट नेते गिरीश धोंगडी, हेमंत हावळ, सुनील जाधव, प्रवीण पाटील, गजानन हांगीरगेकर, सौरभ सावंत, आदित्य पाटील, अरुण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.


