बेळगाव लाईव्ह : हुक्केरी तालुक्यातील गुडस गावातील गायरान जमिनीचे हस्तांतरण न करता, त्यावरील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी मेंढपाळ समाजाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत, आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
सिंदूर कुरीगार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “गुडस गावातील गट नं. ४०१ मध्ये २३ गुंठे गायरान जमीन आहे. या जमिनीवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे आमच्या मेंढ्यांना चरायला जागाच राहिलेली नाही.” ही गायरान जमीन जनावरे आणि मेंढ्यांसाठी आरक्षित आहे.
या जागेवर गावातील देवीचे ‘लग्गम्माव्वा’ मंदिरही आहे. या जमिनीवरील डोंगरातून पाझरणारे पाणी एका तलावात जमा होते, जे पाच गावांतील मेंढ्यांसाठी उपयोगी पडते. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
बसवाणी निडसोसी यांनी सांगितले की, “गुडस गावातील गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही हुक्केरीचे तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेकदा केली. पण, अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले आहे.”
यावेळी बसप्पा वंटमुरी, रायप्पा पामलदिन्नी, आनंद खिलारी, गुरुसिद्ध गोतुर, हलाप्पा नुली यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.


