बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी कर्नाटक सरकारच्या कन्नड सक्तीच्या धोरणाविरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.
सीमा विवादावर न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही मराठी भाषिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करत याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठी भाषिकांना भक्कम पाठबळ पुरवावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सीमाप्रश्न न्यायालयात प्रलंबित असतानाही कन्नड सक्ती लागू केली जात आहे. याचा विरोध करणाऱ्या मराठी नगरसेवकांना हद्दपार करण्याची मागणी काही संघटना करत आहेत. कन्नड सक्तीसाठी अनेक कन्नड संघटना जाणीवपूर्वक प्रशासनावर दबाव आणून मराठी भाषिकांना वेठीला धरत आहेत. कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करत, भाषिक अल्पसंख्यांक हक्काचे उल्लंघन करत मराठी भाषिक भागात जबरदस्तीने कन्नडीकरण केले जात आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कार्यकाळात केंद्रीय सिमसमन्वयक समितीचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सीमाभागातील परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश देण्यात आले असतानाही या आदेशाला हरताळ फासून कन्नडसक्तीच्या नावाखाली मराठी भाषिकांना वेठीला धरले जात आहे.
महानगरपालिकेवरील मराठी फलक, महापौर-उपमहापौरांच्या वाहनावरील नंबर प्लेट, व्यावसायिकांच्या फलकावरील कन्नडसक्ती यासह गणेशोत्सवाच्या फलकांवरही वक्रदृष्टी ठेवून जाणीवपूर्वक कन्नडसक्ती लादून मराठीवर गदा आणण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.
सीमाप्रश्नी जोवर सर्वोच्च न्यायालयात निकाल जाहीर होत नाही तोवर सीमाभागातील परिस्थिती जैसे थे ठेवणे गरजेचे असून सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्र सरकारने भक्कम पाठबळ द्यावे, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली.


